Mon, Jun 17, 2019 00:19होमपेज › Nashik › अन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो!

अन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

पोलिसांना बघून चांगल्या-चांगल्याचे धाबे दणाणतात. पोलिसांनी बघून अनेकांना घाम फुटतो. मात्र, साप थेट पोलीस ठाण्यामध्ये शिरल्याने पोलिसांनाही चांगला घाम फुटल्याचा प्रत्यय नुकताच सिन्नरकरांना बघावयास मिळाला. 

सिन्नर पोलीस ठाण्याच्या आवारात नेहमीच सकाळपासून नागरिकांची वर्दळ असते. मात्र, दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यामध्ये साप शिरल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली. साप पकडण्यासाठी  शहरातील दोन सर्पमित्रांना आमंत्रित करण्यात आलेे.

सर्पमित्रांनीही पोलिसांचा कॉल म्हटल्यावर तत्काळ हजेरी लावत सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ठाण्यामधील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानामुळे सापाचा शोध घेण्यास सर्पमित्रांना अनेक अडचणी येत होत्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही सापाला पकडण्यात सर्पमित्रांना अपयश आले. 

साप अद्यापही ठाण्यामध्येच असल्याच्या संशयावरून पोलीस कर्मचार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे आवारात फिरणे पोलिसांना मुश्कील झाले आहे. 
स्वत:सह लॉकअपमध्ये असलेल्या संशयित आरोपींच्याही जिवाला धोका असल्याची चर्चा पोलिसांमध्ये खासगीत सुरू होती. सापाच्या दहशतीमुळे रात्रपाळीसाठी कामावर येण्यास पोलीस कर्मचारी तयार होत नसल्याची चर्चा आहे.