Mon, Jun 17, 2019 03:06होमपेज › Nashik › इर्टिगा कारने चार साईभक्तांना चिरडले

इर्टिगा कारने चार साईभक्तांना चिरडले

Published On: Dec 11 2017 2:00AM | Last Updated: Dec 11 2017 1:42AM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

भरधाव इर्टिगा कारने चार साईभक्तांना चिरडल्याची घटना रविवारी (दि.10) पहाटे 5.45 च्या सुमारास सिन्नर-घोटी महामार्गावरील हरसुले फाटा येथे घडली. या अपघातात एक साईभक्त ठार, तर तीन साईभक्त गंभीर जखमी झाले आहे.

इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील काही तरुण साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी पायी पालखीत निघाले होते. हरसुले फाट्याजवळ घोटीहून सिन्नरच्या दिशेने येणारी भरधाव इर्टिगा कार (एमएच 04, जीयु 3113) थेट साईपालखीत शिरली. काही समजण्याच्या आत चार साईभक्तांना उडवून दिले. या अपघातात रोशन गणेश लगड (18, रा. टाकेद) हा साईभक्त जागीच ठार झाला. तर योगेश बाळू भुसे (23), पांडुरंग संपत काळे (22), राहुल राजाराम लगड (19) हे तीन साईभक्त गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. हरसुले फाट्यावर वारंवार अपघात घडत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी व साईभक्तांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोची माहिती मिळताच आमदार राजाभाऊ वाजे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस हवालदार भगवान शिंदे, प्रवीण पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार वाजे आणि पोलीस निरीक्षक देशमुख यांनी साईभक्तांसह ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये कारचालकाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे पुढील तपास करत आहेत.