Sat, Aug 24, 2019 19:07होमपेज › Nashik › सिन्नरला ग्रा.पं. तीन जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

सिन्नरला ग्रा.पं. तीन जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

Published On: May 28 2018 3:10PM | Last Updated: May 28 2018 3:01PMसिन्नर : प्रतिनिधी  

तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीच्या दोन व दापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.28) जाहीर झाला. निकाल ऐकण्यासाठी सोमठाणे आणि दापूर येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

तालुक्यातील हिवरगाव ग्रामपंचायतीच्या तीन, सोमठाणे ग्रामपंचायतीच्या दोन  तर मिठसागरे आणि दापूर ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी  हिवरगावच्या तीन तर मिठसागरेच्या एका जागेची निवडणूक बिनविरोध पार पडली. मात्र, सोमठाणे येथील दोन जागांसाठी आणि दापूर येथील एका जागेसाठी रविवारी (दि.27) मतदान प्रक्रिया पार पडली.

सोमठाणे येथे प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वसाधारण स्त्रीच्या एका जागेसाठी अरुणा कैलास होडमिसे आणि कमलबाई एकनाथ साळवे यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये साळवे यांनी होडमिसे यांचा 139 मतांनी पराभव केला. तर  प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वसाधारणच्या एका जागेसाठी विनायक विठ्ठल कोकाटे आणि संजय निवृत्ती धोक्रट यांच्यात सरळ सामना झाला. कोकाटे यांनी 74 मतांनी धोक्रट यांचा पराभव केला. 

दापूर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वसाधारण स्त्रीच्या एका जागेसाठी चार जणांनी अर्ज दाखल केले होते. पैकी माघारीच्या दिवशी मंदाबाई अजय कडाळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शारदा अण्णासाहेब आव्हाड, संगीता नंदू काकड आणि मनीषा परशराम शिंदे यांच्यात तिरंगी सामना झाला होता. काकड यांना 107 तर शिंदे यांना 83 मते मिळाली. आव्हाड यांनी 118 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय गोसावी आणि पी. जी. गायकवाड यांनी काम पाहिले.