Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Nashik › ऐन उन्हाळ्यात बत्ती गूल; नाशिककर घामाघूम

ऐन उन्हाळ्यात बत्ती गूल; नाशिककर घामाघूम

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:31AMनाशिक : प्रतिनिधी

उन्हाच्या कडाक्याने नाशिककर हैराण झाले असतानाच रविवारी (दि. 8) पंचवटी, जुने नाशिक, नाशिकरोडसह शहरातील विविध भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्याचे पहायला मिळाले. ऐन उन्हाळ्यात विजेअभावी पंखे, एसी व कुलर बंद पडल्याने नाशिककर घामाघूम झाले. नाशिककरांना महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. या प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली असून, गेल्या दोन दिवसांपासून पार्‍यात दोन अंशांची घसरण झाली आहे. मात्र, तरीही उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. उन्हामुळे रविवारची सुट्टी घरातच घालविण्याचचे नियोजन केलेल्या शहरवासीयांना महावितरणच्या गलथानपणामुळे मन:स्ताप सहन करावा लागला. शहराचा मुख्य भाग असलेल्या जुने नाशिक, पंचवटी तसेच सातपूर व नाशिकरोडच्या काही भागांमध्ये दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडीत झाला. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर पूर्ववत होत होता. भरदुपारी विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक पुरते हैराण झाले. त्यातही लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठांना अधिक त्रास सहन करावा लागला. 

वास्तविक पाहता दरवर्षी मार्च ते मे याकाळात विजेच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळेच महावितरणकडून त्यादृष्टीने अतिरिक्त वीज उत्पादनाची तसेच इतर तयारी करणे अपेक्षित असते.