होमपेज › Nashik › शॉर्टसर्किटचा सिलसिला सुरूच

शॉर्टसर्किटचा सिलसिला सुरूच

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 10:19PMसायखेडा : वार्ताहर

निफाड तालुक्यातिल गोदाकाठ भागात शॉर्टशर्किटचा सिलसिला सुरुच असून, महिनाभरात या भागात तीन ठिकाणी झालेल्या शॉर्टशर्किटमुळे ऊसाचा कोळसा होत, शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी (दि.28) दुपारी 1 वाजेच्या सुमारास सोनगाव (ता. निफाड) येथेे ट्रान्सफार्मरवर झालेल्या शॉर्टशर्किटमुळे नमर्दा तानाजी कारे यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाला.

गत काही महिन्यांत गोदाकाठ भागातील शेकडो एकर ऊस शॉर्टशर्किटच्या भक्ष्यस्थानी पडला असतांना शॉर्टशर्किटचा सिलसिला कायम आहे. या महिनाभरात सोनगाव येथेे विस-पंचविस दिवसांपूर्वी पुंडलिक खालकर यांचा, दोन दिवसांपूर्वी चाटोरी येेथे मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटून झालेल्या शॉर्टशर्किटमुळे भाऊसाहेब हांडगे यांचा तर रविवारी नर्मदा कारे, तानाजी कारे यांच्या शेती क्षेत्रातील ट्रान्सफार्मरवर झालेल्या शॉर्टशर्किटमुळे दोन एकर ऊसाचा कोळसा झाला आहे. लोंबकळणार्‍या तारा, जीर्ण झालेले विद्युत पोल, नादुरुस्त ट्रान्सफार्मरमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असताना महावितरण विभाग कोणतेही पाऊल उचलत नसल्याने मोठी आर्थिक झळ शेतकर्‍यांना सहन करावी लागत आहे. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे शेतकरी जेरीस आला असून, तोंडाशी आलेली पिके महावितरणच्या निष्काळजीपणामुळे राख होत आहे. जीर्ण झालेल्या तारा, पोल, वायर, ट्रान्सफार्मर त्वरित बदलावे, झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत त्वरित मिळावी अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ, रहिवासी करत आहेत.