Wed, Feb 26, 2020 09:41होमपेज › Nashik › बारा ज्‍योतिर्लिंगपैकी एक नाशिकचे त्र्यंबकेश्‍वर 

बारा ज्‍योतिर्लिंगपैकी एक नाशिकचे त्र्यंबकेश्‍वर 

Published On: Aug 19 2019 12:07PM | Last Updated: Aug 19 2019 11:23AM
त्र्यंबकेश्वर : ज्ञानेश्वर महाले

॥गोदावरी तटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती॥ 

भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे. तीन पर्वत-ब्रह्मगिरी, अंजनेरी, नील, तीन नद्या-गोदावरी, वैतरणा, गौतमी, तीन संस्कृती- द्रविड, जैन, वैदिक आणि तीन देव-ब्रह्मा, विष्णु, महेश म्हणून हे त्र्यं(तीन)बकेश्वर. ब्रह्मगिरीच्या डोंगररांगांच्या कुशीत हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे केंद्र त्र्यंबकेश्वर नगरी होती. सुर-असुरांच्या समुद्र मंथनातून अमृताच्या कलशातील चार थेंब येथील कुशावर्त तीर्थात पडल्याची आख्यायिका आहे. कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या ठिकाणी हजारो भाविक स्नान करतात. ब्रह्मगिरीच्या डोंगरारांगातून गौतम ऋषींच्या गो-हत्येच्या पापक्षालनाकरिता महादेवांच्या जटेतून साक्षात गंगाच ब्रह्मगिरी शिखरावर अवतरली. गंगाद्वारी उगम पाहून ती जी लुप्त झाली ती थेट कुशावर्ती दिसली. तिचा प्रवाह गौतम ऋषींनी नियंत्रित करून तिच्याभोवती मांडलेल्या गवताच्या (कुश) काड्यांनी हे तीर्थ निर्माण झाले, अशी आख्‍यायिका आहे. हिच गंगा पुढे गोदावरी नावाने द्वीपकल्पीय पठारावरील सर्वांत लांब नदी थेट दक्षिणेतील राजमहेंद्रीपर्यंत वाहत जात बंगालच्या उपसागराला मिळते. तिच्या वाटेत येणाऱ्या अनेक प्रदेशांची ही जीवनदायिनी 'दक्षिण गंगा' म्हणूनही ओळखली जाते. 

कुशावर्त स्नानाचे महत्त्व 

गोदावरीला 'दक्षिण गंगा' म्‍हणून ओळखले जाते. त्‍यामुळेच कुशावर्त स्नानाचे महत्त्व गंगा स्नानाइतकेच आहे. त्‍यामुळे कुशावर्त तीर्थात सिंहस्थ पर्वणी काळात लाखो भाविकांनी स्नान केले. पण, श्रावणातही प्रत्‍येक सोमवारी भाविक स्नानासाठी येथे गर्दी करतात. कुशावर्त तीर्थावर स्‍नान करून भाविक शिवाचे दर्शन घेतात. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि पुन्हा शिवाचे दर्शन घेतात. 

त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य

मूळ त्र्यंबकेश्वराच्‍या स्थानाला अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. इतर ज्योतिर्लिंगापेक्षा हे स्‍थान वैशिष्‍ट्‍यपूर्ण आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिरात फक्त शिवलिंग नसून ब्रह्मा, विष्णु, महेश या देवता लिंगरूपात आहेत. पूर्व दिशेला मुख्य द्वार असून मंडप, चौकोनी अंतराळ व नंतर गुहेसारखे खोल गर्भगृह अशी रचना आहे. कळस व छोटी-छोटी  शिखरे यांनी मंदिराचे स्थापत्य समृद्ध करतात. बाहेरच्या या भिंतींवरचे नक्षीकाम पाहण्याजोगे आहे. फुले, प्राणी, मनुष्य, यक्ष, देवता यांच्या प्रतिमा त्यावर कोरलेल्या आहेत. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहणाऱ्यास थक्क करते. पुरातत्त्व विभागाकडे विशेष जतन करण्यात येणार्‍या स्थळांच्या यादीत याचाही समावेश होतो. दर्शनाबरोबरच निसर्ग भ्रमणही अनुभवावे असे हे ठिकाण आहे. 

त्र्यंबकेश्वराचे ऐतिहासिक महत्त्‍व

सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिकपासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. त्याकाळी हे मंदिर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला होता. जवळपास ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. 

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. चार प्रवेशद्वारे असलेल्यापैकी उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजीकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे. 

मंदिराच्‍या कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंचे आहे. कलश आणि ध्वज अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केले आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकर यांनी केला. या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पुजले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी 'श्रीं'च्‍या चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मुघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करून त्र्यंबकेश्वरचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्त्‍व असून भगवान शिवच्या गळ्‍यात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात. 

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी असते. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून बसगाड्यांची सोय आहे.

येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. मुंबईपासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी -  मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. 

त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव 

१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.

आद्य ज्योर्तिलिंग श्री त्र्यंबकराजाची त्रिकाल पूजा नैवेद्य तसेच वर्षभर होणारे सन व उत्सव यांची व्यवस्था पाहण्याचे काम श्री. त्र्यंबकेश्वर संस्थान करत असते. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी याकरिता नारो दामोधर जोगळेकर यांची संस्थानाचे कारभारी म्हणून नेमणूक केली आणि याकरिता आवश्यक असेल्या खर्चाची तजवीज करून ठेवली. पुढे ब्रिटीश राजवटीतदेखील ही परंपरा चालू राहिली. 

श्री त्र्यंबकेश्‍वराच्‍या तिन्‍हीही पूजेबद्दल

श्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा - अर्चन - तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे सुरू आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक-अर्चन-पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.

या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मूळ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ. स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल. शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. 

वसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असताना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज 'स्पंद करिका' म्हणून प्रसिध्द आहे. 

पेशवे काळापासून पेशव्यांनी त्रिकाल पूजा सुरू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली. पूजा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी व्यवस्था केली. पेशव्यांनंतर इंग्रज आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे सुरू आहेत. या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. या पूजेमध्ये तिन्‍हीही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात. 

त्र्यंबकेश्वरला जाण्याचा मार्ग

हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. (३९ किमी.)
रेल्वे मार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिक रोड, मध्यरेल्वेपासून ४० किमी. अंतरावर.
बस मार्ग  - मुंबई-त्र्यंबकेश्वर १८० किमी, पुणे-त्र्यंबकेश्वर २०० किमी

नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.

नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाड्‍या दर अर्ध्या तासाने सुरू असतात. त्र्यंबकेश्वर हे नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून ४० किमी. अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयीसुविधांनीयुक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार राहण्याची सोय करतात.