Wed, Jun 20, 2018 16:52



होमपेज › Nashik › शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने निधन

शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने निधन

Published On: Jun 13 2018 4:18PM | Last Updated: Jun 13 2018 11:35PM



नाशिक : प्रतिनिधी

‘तुझ्या बोलण्याचं ऐसं, ‘दलिता रं हल्ला बोलना’, ‘समतेच्या वाटेनं खणकावीत पैंजण याव’,‘ आठवा भगत सिंग कसा कसा घडला’, ‘बाजार बाजार दडलाय रं’, झेंडा वंदन करून जा’,‘पळू नका दुनिया सारी बदला’, ‘बाळ रडलं रडलं बाळ उपाशी झोपलं’, अशा क्रांतिकारी गीतांच्या माध्यमातून चळवळीचा विचार पेरत समतेचे गाणे गाणारे विद्रोही शाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (दि.13) निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. शंतनू यांच्या अकाली जाण्याने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शंतनू यांचा अंत्यविधी आज (दि.14) होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथून सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी दीपाली आणि मुलगा कनिष्क असा परिवार आहे. 

शाहीर शंतनू कांबळे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. प्रकृती खालावल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या शाहिरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मूळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येेथेही काही काळ त्यांचे वास्तव्य होते. मात्र, आजारपणानंतर ते नाशिकला स्थायिक झाले होते.  2005 मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती.

रायपूर येेथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. 100 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, तपासाअंती न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी तुरुंगात  मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप शंतनू यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळून होते. त्यांना क्षयरोग जडला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी वडाळ्याहून नाशिकला मुक्काम हलवला होता. मात्र, नाशिकमध्ये आल्यानंतरही आजाराने त्यांची पाठ सोडली नव्हती. अखेर आजाराशी लढता लढताच त्यांची प्राणज्योत मालवली.