Mon, Jul 22, 2019 01:24होमपेज › Nashik › गांजा विक्रीतील ‘लक्ष्मी’चा जिल्हा रुग्णालयात निवास

गांजा विक्रीतील ‘लक्ष्मी’चा जिल्हा रुग्णालयात निवास

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:19PMनाशिक : गौरव अहिरे

गांजा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या लक्ष्मी ताठे या संशयित महिलेचा सध्या जिल्हा रुग्णालयात मुक्काम आहे. जुलाब आणि उलट्या होत असल्याच्या कारणावरून तिला मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ‘लक्ष्मी’ दर्शनानेच जिल्हा रुग्णालयाच्या औषधोपचारानेही तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याची चर्चा रुग्णालयीन वर्तुळात रंगली आहे. 

तपोवन परिसरात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करीत 800 किलो गांजा आणि दोघा संशयितांना पकडले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून हा गांजाचा साठा पंचवटीतील लक्ष्मी ताठे या शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याच्या मागणीवरून आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास करून लक्ष्मी ताठेला मध्यप्रदेशातील सेंधवा येथून अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत तिच्या चौकशीदरम्यान, आणखी 600 किलो गांजाचा साठा पोलिसांनी हस्तगत केला तसेच लक्ष्मी ताठेच्या जावयासह इतर संशयितांनाही अटक केली. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लक्ष्मी ताठेला मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. मात्र तेथे अचानक तिला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या व  उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. सुमारे पंधरा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय विभागात लक्ष्मीवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांनी प्रयत्न करूनही लक्ष्मीचा त्रास कमी होत नसल्याचे तो चर्चेचा विषय बनला आहे. पंधरा दिवसांपासून लक्ष्मीवर औषधोपचार करूनही तिच्या तब्येतीत कोणताच सकारात्मक परिणाम न झाल्याने ङ्गलक्ष्मीफ दर्शनाची जोरदार चर्चा रुग्णालयात रंगली आहे. 

रुग्णालयात दाखल केल्यापासून लक्ष्मी ताठेला भेटण्यासाठी दिवसभर तिच्या हितचिंतकांची रांग लागलेली असते. त्यामुळे लक्ष्मी खरेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली आहे की जामीन मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दाखल झाली आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भेटणार्‍यांमध्ये राजकीय क्षेत्रातीलही व्यक्‍ती येत असल्याचे चित्र आहे. या भेटीगाठीच्या माध्यमातून लक्ष्मी ताठे सुटण्यासोबतच गुन्ह्यातील तीव्रता कमी करण्याची धडपड करीत असल्याची चर्चा रंगली आहे. 

लक्ष्मी ताठे यांना जुलाब, उलट्या होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विभागातील डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतरच त्यांच्या डिस्चार्जसंबंधी निर्णय घेतला जाईल. 

- डॉ. प्रमोद गुंजाळ, अतिरीक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक