Thu, Jul 09, 2020 09:17होमपेज › Nashik › बोगस अपंग शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

बोगस अपंग शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:54PM

बुकमार्क करा

सटाणा : वार्ताहर

 बोगस अपंग शिक्षकांवर थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले असून, कारवाईच्या पहिल्या फेर्‍यात जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षक बागलाण तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे.पडताळणीसाठीही जिल्ह्यातून सर्वाधिक प्रमाणपत्र तालुक्यातूनच पाठविण्यात आले असून, शंभराहून अधिक शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणावरून होणार्‍या पडताळणीत आणखी किती जणांवर गंडांतर येते याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

तालुक्यातील चार शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघाले असून, उर्वरित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच प्रत्यक्षात थेट कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अर्थात, या कारवाईचा मूळ अपंगांनाही फटका बसला असून, प्रतिकूल शेर्‍यामुळे त्यांचीही पंचाईत झाली असली तरी बोगस मंडळींचे मात्र भलतेच धाबे दणाणले आहेत. तालुक्यात सुमारे 940 प्राथमिक शिक्षक सेवेत आहेत. त्यापैकी जवळपास 113 शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. नाशिक येथील वैद्यकीय मंडळाकडे 99, धुळे येथे 10, जे. जे. मुंबई येथे 2, औरंगाबाद व जळगाव येथे प्रत्येकी एका शिक्षकाचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. सर्व ठिकाणांवरून अद्याप पडताळणी झालेली नसून नाशिक येथील प्राप्त अहवालानुसार पहिल्याच कारवाईत तालुक्यातील चार शिक्षकांवर निलंबनासह थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत तालुका गटशिक्षणाधिकारी एस. एस. बच्छाव यांनी पोलिसांत गुन्हा नोंद करावा, असे स्पष्ट आदेश असले तरी तालुक्यातील उर्वरित पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच एकत्रितपणे थेट गुन्हे दाखल होतील, असा अंदाज आहे. प्रमाणपत्रांची शहानिशा झाल्यानंतर प्रतिकूल शेरा आल्यास तालुकास्तरावरील कमिटीकडूनही पुन्हा पडताळणी करण्यात येणार असल्याचेही समजते. या कमिटीत तालुका गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व अन्य सदस्यांचा समावेश आहे. वैद्यकीय मंडळाच्या अहवालानुसार खात्री झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. साहजिकच उर्वरित अहवालांतून आणखी किती शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल याबाबत उत्सुकता दिसून आहे. आ. बच्चू कडू आणि राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीमुळे ही कार्यवाही होत असून, त्यात तालुक्यातील बोगस शिक्षकांची दांडी उडण्याची शक्यता असल्याने धाबे दणाणले आहे.