Thu, Mar 21, 2019 11:23होमपेज › Nashik › खुर्ची सोडेना पाठ; आश्‍वासनांची ‘वाट’!

खुर्ची सोडेना पाठ; आश्‍वासनांची ‘वाट’!

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 11:44PMपिंपळगाव बसवंत : रावसाहेब उगले

ग्रामपंचायत निवडणूक होताच आवर्तन पद्धतीनुसार एक वर्षानंतर सरपंच, उपसरपंच पद देण्याची आश्‍वासने दिली गेली. विरोधकांच्या जोरदार मागणीनंतर उपसरपंचाने राजीनामाही दिला. मात्र, सरपंच महोदय खुर्ची सोडण्यास तयार नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे खुर्चीचा मोह सोडेना पाठ अन् आश्‍वासनांची लागली वाट असे म्हणण्याची वेळ आली आहे.

निफाड तालुक्यातील कारसूळ ग्रामपंचायतीची तीन वर्षार्ंपूर्वी निवडणूक झाली. यामध्ये एकच पॅनल बिनविरोध निवडून आला. केवळ पॅनलप्रमुखाच्या अट्टाहासामुळे एका जागेसाठी निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत मात्र या विरोधी पक्षातील सदस्य निवडून आला. त्यामुळे 8 विरुद्ध 1 असे संख्याबळ ग्रामपंचायतीत झाले. बहुमताचा आकडा असल्याने सरपंचपदी रामकृष्ण कंक, तर उपसरपंचपदी देवेंद्र काजळे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड करताना सरपंच, उपसरपंच पदासाठी वर्षाचे आवर्तन ठरले होते. त्यावर इतर सदस्यही राजी झाले. 

नव्या दमाच्या शिलेदारांनी गावगाडा हाकण्यास सुरूवात केली. मात्र, जसजशी पदांची वर्षपूर्ती होऊ लागली तसतशी आवर्तनाची आठवण इतर सदस्यांना होऊ लागली. सरपंच, उपसरपंच स्वत:हून राजीनामे देण्याचा विषय घेईना. त्यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू झाली. राजीनाम्यांबाबत जाहीर चर्चाही झडू लागल्या. शेवटी तीन वर्षांनंतर काजळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि या पदावर योगिता पगार विराजमान झाल्या. मात्र, आश्‍वासनानुसार सरपंच रामकृष्ण कंक यांच्या राजीनाम्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांनी राजीनामा दिल्यास उज्ज्वला गांगुर्डे यांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे. मात्र, कंक हे राजीनाम्यानंतरच पुढचे मार्ग खुले होतील. अन्यथा त्यासाठीही इतर सदस्यांना भांडावे लागेल, की कंक स्वत:च जनरेट्यापुढे झुकून राजीनामा देतात हे हे येणारा काळच ठरविणार आहे.