Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Nashik › पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात

पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:54AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील बसस्थानकाजवळील एका दुकानात बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीची  व्याप्ती राज्यभर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे. या टोळीने आतापर्यंत संपूर्ण राज्यात विविध शहरांमध्ये पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांना आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी ऐरोली (नवी मुंबई) येथून आणखी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली आहे. दोन हजाराच्या 123 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

सूरज ऊर्फ मनीष मल्ला ठाकुरी (वय 34, घनसोली, नवी मुंबई), जिलानी आशपाक शेख (वय 47, रा. ऐरोली, नवी मुंबई) अशी शुक्रवारी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी (दि. 23) बसस्थानकजवळील एका दुकानात खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर या संशयितांनी तिथे दोन हजारांची बनावट नोट दिली. रात्री पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी राजसिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

अन्य तिघे पसार झाले होते. 

त्यानंतर प्रेमविष्णू राफा आणि नरेंद्र ठाकूर यांना कल्याण येथून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून दोन हजारांच्या 29 नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. शिवाय दोन मोबाईलही जप्त करण्यात आले होते.  

सुरुवातील अटक केलेल्या राजसिंह याच्याकडील चौकशीनंतर प्रेमविष्णू राफा, नरेंद्र ठाकूर यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुरुवारी पोलिसांचे पथक कल्याणला गेले होते. तेथे चौकशी केल्यानंतर ऐरोलीतून सूरज ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. 

अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक अशोक वीरकर, सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस हवालदार बिरोबा नरळे, नाईक सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांनी कारवाई केली. 

रखेलीच्या माध्यमातूनतस्करांशी संपर्क

मूळच्या पश्‍चिम बंगालच्या असलेल्या एका महिलेशी प्रेमविष्णू राफा याचे अनैतिक संबंध आहेत. त्यातून त्याचे पश्‍चिम बंगालला जाणे-येणे होते. त्यातूनच त्याची बनावट नोटांची तस्करी करणार्‍या जिलानीशी ओळख झाली होती. त्यातूनच त्याने लाखो रूपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या आहेत.

आतापर्यंत आठ मोबाईल जप्त

यापूर्वी अटक केलेल्या राजसिंह, प्रेमविष्णू राफा, नरेंद्र ठाकूर यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते. शुक्रवारी अटक केलेल्या जिलानी शेख, सूरज ठाकुरी यांच्याकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ मोबाईल जप्त केले आहेत. 

इंटरनेटद्वारे शहरांची निवड

दरम्यान, पश्‍चिम बंगालमधून आणलेल्या बनावट नोटा खपवण्यासाठी इंटरनेटवरून शहरांचा शोध घेतला जात होता. हा शोध  राफा स्वतः घेत होता. त्यानंतर नोटा खपवण्यासाठी संबंधितांना त्या शहरात पाठवण्यात येत होते. 

तीनशे रूपयांसाठी खपवत होते नोटा

दरम्यान राफाकडे राजसिंह, नरेंद्र ठाकूर यांच्यासारख्या अनेकजणांची नोटा खपवणारी टोळी आहे. गरीब परिस्थितीतील युवक शोधून त्यांना नोटा खपवण्याचे काम देण्यात येत होते. दोन हजार रूपयांची एक बनावट नोट खपवल्यानंतर त्या युवकांना त्यातील तीनशे रूपये कमिशन म्हणून देत होते. या कमिशनसाठी सिंह, ठाकूरसारखे अनेकजण त्याच्याकडे नोटा खपवण्याचे काम करत होते. 

जिलानी पूर्वीपासून बनावट नोटांच्या तस्करीत 

यातील मुख्य संशयित जिलानी शेख हा पूर्वीपासून बनावट नोटांच्या तस्करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर नाशिकमध्ये बनावट नोटांप्रकरणीच पूर्वीच एक गुन्हा दाखल आहे. पूर्वी चलनात असलेल्या एक हजार आणि पाचशे रूपयांच्या बनावट नोटांचीही तो तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.