Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Nashik › समृद्धीच्या कामाला फेब्रुवारीत सुरुवात

समृद्धीच्या कामाला फेब्रुवारीत सुरुवात

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:46PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी शेतकरी जमिनी देत असून, प्रकल्पाच्या कामाला येत्या फेब्रुवारीत प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. समृद्धीमुळे राज्याचे चित्र पालटणार असून, भविष्यातील नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प शहराशी जोडण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 

क्रेडाई नाशिकच्या शेल्टर-2017 प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी (दि.26) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समृद्धी प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असून, डिसेंबरअखेरीस राज्यात 50 टक्के जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल. जानेवारीत निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण करतानाच फेब्रुवारीत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नाशिकचा विस्तार झपाट्याने होत असून, भविष्याचा विचार करता समृद्धी प्रकल्प शहराला जोडण्यात येईल. त्यासाठी मुंबईतील अधिकार्‍यांना अभ्यास करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.