Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Nashik › ‘मुलगा’ शब्दामुळे भिडे गुरुजी अडचणीत सापडण्याची चिन्हे 

‘मुलगा’ शब्दामुळे भिडे गुरुजी अडचणीत सापडण्याची चिन्हे 

Published On: Jun 26 2018 8:27AM | Last Updated: Jun 26 2018 8:27AMनाशिक : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्या वादग्रस्त विधानामध्ये ‘मुलगा’ हा शब्दप्रयोग आल्याने त्यावरून ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या शब्दामुळे त्यांच्याकडून लिंगभेद निर्माण करण्यात आल्याने मनपा वैद्यकीय विभागही याच शब्दाच्या आधारे चौकशीचे सूत्रे फिरवित आहे. तत्पूर्वी, भिडे गुरुजी यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीचे उत्तर काय येते याची वैद्यकीय विभागाला प्रतीक्षा असून, त्यानंतरच फिर्याद दाखल करायची की काय याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक येथील एका जाहीर सभेत भिडे गुरुजी यांनी माझ्या बागेतील आंबा खाणार्‍या जोडप्यांना मुले होतात. तसेच, मुलगा हवा असल्यास मुलगाच होतो, असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वाक्यामुळे गदारोळ निर्माण होऊन अनेक संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. गणेश बोर्‍हाडे यांनी मनपा वैद्यकीय विभाग तसेच आरोग्य संचालकांकडे याबाबत तक्रार करून चौकशी करण्याबाबत निवेदन सादर केले होते. त्याआधारे भिडे गुरुजींच्या त्या वादग्रस्त क्लीपची तपासणी करून त्याआधारे त्यांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावण्यात येऊन त्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागितले आहे. 

या प्रकरणाची चौकशी वैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी आणि पीसीपीएनजीटीचे डॉ. प्रशांत शेटे हे करत आहेत. नोटिसीचे उत्तर आल्यानंतर चौकशी समितीची बैठक होऊन त्यात कोणती कार्यवाही करायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु, प्राथमिक चौकशीत भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यात मुलगा हा शब्द आल्याने त्यामुळे लिंगभेद निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा कयास अधिकार्‍यांनी लावला आहे. त्यानुसार गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व निदान तकनीक (पीसीपीएनजीटी) या समितीकडून गर्भलिंग निदान नियंत्रण कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रथम फिर्याद दाखल केली जाईल आणि त्याबाबतचा अहवाल पुणे येथील आरोग्य संचालकांकडे सादर केला जाणार आहे.