Tue, Mar 19, 2019 05:14होमपेज › Nashik › ‘कसमादे’तही 300 कोटींची लूट!

‘कसमादे’तही 300 कोटींची लूट!

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 1:56AMविरगाव : वार्ताहर

रॉयल ट्विंकल स्टार व सिट्रस चेक इन्स लि. या कंपनीकडून कसमादे परिसरातील ठेवीदारांचीही मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर येत आहे. हा आकडा सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत असून, देवळा, सटाणा, मालेगाव व विरगाव येथील एजंटवर्गांच्या माध्यमातून या मेंबरशिप देणार्‍या कंपनीत ही गुंतवणूक झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुदत संपूनही देणेकर्‍यांची देणी देण्यास कंपनी असमर्थ ठरत असल्याने गुंतवणुकदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याप्रकरणी न्याय मागितला आहे.

भरघोस कमिशन तसेच गुंतवणुकीवर घसघशीत परतावा देण्याचे आमिष एजंट तसेच गुंतवणूकदार यांना दाखवून सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीने लासलगाव परिसरातील ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे मालक ओमप्रकाश गोयंका व संचालक मंडळावर लासलगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर देशभरातील सुमारे 90 हून अधिक चीटफांड गोळा करणार्‍या खासगी कंपन्यांवर ईडी तसेच सेबीच्या माध्यमातून निर्बंध आणल्यानंतर या सर्व कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. मात्र, यात आता सर्वसामान्य गुंतवणूक अडकला असून, व्यवसाय बुडाल्याच्या कारणास्तव या कंपनी आता देणेकर्‍यांचे देणी देण्याऐवजी पळवाटा शोधतांना दिसून येत आहेत.

या कंपनीवरही सेबीच्या माध्यमातून प्रशासक नियुक्त होऊन लवकरात लवकर देणेकर्‍यांच्या देणी दिल्या जाव्यात, असे आदेश वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. मात्र, कंपनीवर  प्रशासक नियुक्त होऊनही गुंतवणूकधारकांची देणी मिळत नसल्याने गुंतवणूकदार वैतागल्याचे दिसून येत आहेत. देणेकर्‍यांचे सुमारे 4700 कोटी रुपयांची देणी असतांना ह्या कंपनीच्या मालमत्तेचे व अन्य मूल्यांकन फक्त 3500 कोटींपर्यंतच होत असल्याने गुंतवणूकदारांनी सर्वोच्च न्यायालयात याविरोधात न्याय मागितला आहे. यासाठी सिट्रस वेलफेर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, आठ दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी कंपनीकडून चार आठवड्यांची मुदत मागून घेण्यात आल्याची खात्रीदायक माहिती आहे.