होमपेज › Nashik › शहापूर महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

शहापूर महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 15 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर महामार्गावर दरोडा टाकणार्‍या टोळीस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीतील चौघांना सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. त्यात विदेशी मद्यासह, कार, दुचाकी असा मुद्देमाल आहे .

योगेश शंकर नवाळे (21, रा. चिंचोली, ता. सिन्नर), राहुल संदीप सोनवणे (रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड), भरत विष्णू पाटील (22, रा. गंगावाडी) आणि आकाश माधव सानप (21, रा. चिंचोली, ता. सिन्‍नर) अशी अटक केलेल्या संशयितांनी नावे आहेत. 

गत आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावर खर्डी गावाजवळ विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या ट्रकचालकास मारहाण करून त्याच्याकडील ट्रक व मद्यसाठा काही दरोडेखोरांनी चोरून नेला होता. हा ट्रक घोटी टोलनाका परिसरातून गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास ट्रकचा आणि दरोडेखोरांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांना खबर्‍यांमार्फत समजले की, सिन्नर परिसरातील हॉटेल शेतकरीच्या पाठीमागील पोल्ट्री फार्ममध्ये काही लोक विदेशी दारुची विक्री करीत आहेत. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खर्डी गावाजवळ टाकलेल्या दरोड्यातील मद्यसाठा आणि एमएच 04 ईएक्स 333 क्रमांकाची कार, एमएच 15 ईएफ 9864 क्रमांकाची दुचाकी जप्‍त केली.

चौघांकडे केलेल्या तपासात त्यांनी सुरज राजपूत, संजू वाघ, राजा यांच्यासह मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली. यातील संशयित राहुल सोनवणे व भरत पाटील हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात नाशिक, ठाणे ग्रामीण तसेच नाशिक शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, रामभाऊ मुंढे, हवालदार दीपक अहिरे, दत्तात्रय साबळे, पोलीस नाईक अमोल घुगे, राजू सांगळे, जालिंदर खराटे, शिपाई संदीप हांडगे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप लगड, रमेश काकडे, योगेश गुमलाडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.