Wed, Apr 24, 2019 11:34होमपेज › Nashik › राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला सेनेचा खोडा : आठवले

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला सेनेचा खोडा : आठवले

Published On: Mar 03 2018 2:38PM | Last Updated: Mar 03 2018 2:45PMनाशिक : प्रतिनिधी

नारायण राणेंचे सुटले नसलं कोडं, तरी राणेंचे भाजपाकडे अडलं घोडं! अशा खास शैलीमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना चिमटा काढतानाच भाजपाने दिलेली राज्यसभेची ऑफर स्वीकारावी, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळात राणेंच्या प्रवेशाला शिवसेनेने खोडा घातल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढविण्याच्या सूचना करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे, असेही आठवले यांनी सांगितले. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला शुक्रवारी (दि.2) 88 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आठवले हे नाशिकमध्ये अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपाने राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्‍वासन दिले खरे. परंतु, सेनेच्या विरोधामुळे ते आजही शक्य झालेले नाही.

विरोध डावलून भविष्यात राणेंना मंत्रिमंडळात घेतल्यास फडणवीस सरकार सत्तेतून जाऊ शकते. अशा परिस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा  देत सरकारमध्ये सहभागी होतील. त्यामुळे भाजपाने राणेंचा प्रवेश लांबणीवर टाकला आहे. राणेंनी या सर्व बाबींचा  विचार करता भाजपाने दिलेली राज्यसभेची ऑफर स्वीकारावी, असे आठवले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे केंद्रात आल्यास  त्यांना देश पातळीवरील राजकारण अनुभवता व बघता येईल, असेही आठवले म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील सरकार चांगले काम करत असून, आगामी 2019 मध्ये मोदींचा वारू कोणी रोखू शकत नाही, असा विश्‍वास  आठवले यांनी व्यक्त केला. त्याचवेळी राज्यातील परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, राज्यात भाजपा व सेना स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेतून भाजपाने सेनेसोबत  चर्चा करून हा प्रश्‍न हाताळावा. प्रसंगी एखादे कॅबिनेट पदही जास्तीचे सेनेला द्यावे, अशी सूचना आठवले यांनी केली. पंतप्रधान  मोदी यांनी या प्रश्‍नात लक्ष घालावे. गरज भासेल तेव्हा या दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थीसाठी तयार असल्याचे  आठवले यांनी सांगतानाच याबाबत लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले. 

आरपीआय भाजपासोबतच!

राज्यात भाजपा-सेनेत समेट होऊन आगामी निवडणुका युती करूनच लढाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. या  निवडणुकांमध्ये जागा वाटपात दोन्ही पक्षांनी तडजोड करावी. गत विधानसभेवेळी दोन  क्रमांकावर असलेल्या जागा या त्यात्या पक्षांना सोडण्यात याव्यात, अशी सूचना आठवलेंनी केली. दरम्यान, भाजपा-सेना एकत्रित लढल्यास आमच्या पक्षाला दोन  लोकसभेच्या तसेच 15 विधानसभेच्या जागा द्याव्यात. तसेच, दोन्ही पक्ष स्वतंत्र  लढल्यास आरपीआय भाजपासोबतच राहिल,  असा निर्वाळा त्यांनी दिला.त्यावेळी भाजपाने लोकसभेच्या पाच तर विधानसभेच्या 35 जागा आरपीआयला द्याव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली.