Sun, Aug 25, 2019 20:04होमपेज › Nashik › भीमा- कोरेगाव दंगलीनंतर हे... राम आठवले!

भीमा- कोरेगाव दंगलीनंतर हे... राम आठवले!

Published On: Mar 04 2018 11:04AM | Last Updated: Mar 04 2018 11:02AMकुंदन राजपूत/संदीप दुनबळे

भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर दलित चळवळीचे नेतृत्व डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या हाती गेल्याने रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले सध्या कमालीचे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच  काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेला उपस्थित राहण्याची तसदी आठवले यांनी घेतल्याची चर्चा आंबेडकरी नेत्यांमध्ये रंगली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीनंतर ‘हे राम आठवले, अशी  कबुली  खासगीत त्यांचे अनुयायी देत आहेत.

राजधानी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सध्या ‘राम’ राज्य आहे. आठवलेंचे नावच रामदास असल्याने ते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत हा इतिहास आहे. राज्यात 1989 ला  रिपाइं एकीकरणाचा प्रयत्न  अयशस्वी झाल्यानंतर दलित चळवळीचे नेतृत्व हे आठवलेंच्या हाती गेले. तेव्हापासून प्रारंभी ‘यूपीए’ व नंतर ‘एनडीए’ असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. रिपाइं एकीकरणावेळी  कोणत्या  विचारधारेसोबत जायचे यावरुन आंबेडकरी नेत्यांमध्ये खल सुरु होता. ही संधी साधत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यांच्या ‘खास’ शैलीत रामदास अशी साद घातली आणि आठवलेंनी राज्यात  समाजकल्याण मंत्रीपद उपभोगले. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा ‘हात’ सोडत ते ‘एनडीए’ मध्ये गेले. त्यामुळे आठवलेंचे यांचे प्रमोशन झाले आणि ते केंद्रात समाज कल्याण राज्यमंत्री  आहेत.  आठवलेंनी मंत्रीपदासाठी दलित चळवळीचा वापर केला, हे आरोप आता काही नवीन नाहीत.मात्र,भीमा कोरेगाव दंगलीनंतर दलित राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.

हिंसाचाराच्या निषेधार्थ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली आणि संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे यात आंबेडकरी जनता स्वत:हूनच रस्त्यावर उतरल्याने बंद यशस्वीही झाला. पण,  बंदमुळे दलित चळवळीचे सुकाणू अ‍ॅड.आंबेडकर यांच्या हाती गेले आणि त्यांच्याकडे राज्यस्तरावरील नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. अर्थात राजकीय वर्तुळात तशी चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मंत्रिपद असून, भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आठवले यांच्यात जनतेने दूर केल्याची भावना निर्माण झाली.कारण दरम्यानच्या काळात केवळ अन् केवळ अ‍ॅड. आंबेडकर यांच्याकडेच  आंबेडकरी जनतेतून दलित चळवळीचे नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळेच अ‍ॅड. आंबेडकर आणि आठवले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असून काही घटनांच्यानिमित्ताने त्याचे पडसादही उमटत  आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांनी कोण ‘आठवले’ म्हणून खिल्ली उडवली. तर आठवले यांनी अ‍ॅड. आंबेडकर म्हणजे तमाशातील दोन तासांचा राजा आहे, या शब्दांमध्ये  जहरी टीका केली.

नाशिकमध्येही सत्याग्रह दिनानिमित्त दोन -दोन कार्यक्रम आयोजित केले गेल्याचे दिसून आले. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्रीमपदामुळे काहींच्या पोटात दुखते, अशी टीका आठवले यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांचे  नाव न घेतला केली. दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्ववादाच्या लढाईवरुन शीतयुध्द भडकले आहे. आंबेडकरी जनतेपासून दूर गेल्याची जाणीव उशीराने का होईना आठवलेंना यांना झाल्याने काळाराम मंदिर  प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेला हजेरी लावत आपल्या खास शैलीत भाषण ठोकले. राजकीय अस्तित्वासाठी आठवलेंना काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा आठवली, अशी टीका त्यांच्यावर 
कार्यकर्त्यांकडून होत आहे.

भीमा-कोरेगावची घटनाच अशी होती की कोणीही हाक दिली असती तरी जनता रस्त्यावर उतरली असती. महाराष्ट्र बंदमध्ये सगळ्याच गटाचे नेते सहभागी झाले. आता आठवले हे मंत्री असून त्यांनी  समाजासाठी प्रमुख भूमिका घ्यायला पाहिजे. - प्रकाश पगारे,अध्यक्ष, संकल्पित रिपाइं

काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त दोन कार्यक्रम झाले. दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण केला. पण यश आले नाही. दोन्ही कार्यक्रम शांततेत झाले, ही आनंदाची बाब आहे. भीमा- कोरेगाव घटनेनंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वैचारिक नेतृत्व केले. रामदास आठवले हे मंत्री असल्यामुळे त्यांना सक्रिय सहभाग घेता आला नाही. ही घटना म्हणजे नियोजनपूर्वक रचलेला कट होता. याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात होता. त्यामुळे बंदची हाक कोणीही दिली असती तरी बंद यशस्वी झालाच असता. बंद श्रेय अ‍ॅड. आंबेडकर यांना देण्यात आले आहे. तर आठवले यांनीही  त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. या दोघा नेत्यांमध्ये कायम दुरावा राहवा म्हणून काही शक्ति कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी हत्यारे  वापरली जातात, हा त्याचाच एक भाग आहे.- तानसेन नन्नावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, रिपाइं आठवले गट

नेतृत्वाची लढाई केवळ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यातच आहे, असे नाही तर अनेक गटही इच्छुक आहेत. ज्यावेळी सामाजिक प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी सर्व समाज एकत्र  होतो. हे भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने सिध्दही झाले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद ची हाक देण्याचे अचूक टायमिंग साधले आणि बंद यशस्वीही झाला. त्यावेळी कोणत्याही  नेत्याने हाक दिली असती तर जनतेने प्रतिसाद दिलाच असता. समाज तर ऐक्याचा आता यापलीकडे गेला आहे. भविष्यात एखादे तरूण नेतृत्व उदयाला येईल, तेच खरे ऐक्य ठरेल. 
- बाळासाहेब कर्डक, समता परिषद जिल्हाध्यक्ष

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. ते बहुजन समाजाचे नेते आहेत. भीमा-कोरेगाव घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यावेळी परिस्थितीच  तशी होती.  आंबेडकरी जनतेत उद्रेकाची भावना होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सर्व गटांनी केले. म्हणून बंद यशस्वी झाला. खरे तर,  नेतृत्वाचा प्रश्‍न निर्माण करणे हीच शोकांतिका आहे.अ‍ॅड.  आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाबद्दल आठवले यांनी शंका घेण्याचे कारण नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करून आठवले यांनी पुढे जायला  हरकत नाही. मंत्रीपद एक नाही दहा मिळतील. संसदीय राजकारणाला आमचा पाठिंबाच आहे.- नानासाहेब भालेराव, अध्यक्ष, राष्ट्रीय दलित पँथर

तुमच्याबरोबर जनता नसेल तर तुम्ही नेता होत नाही. रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाबरोबर 90 टक्के जनता आहे, हे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रनदिनानिमित्त आयोजित सभेच्या गर्दीवरून  दिसून आले. प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्याने त्यांचा सन्मान आम्ही करतो. आठवले गट भाजपा-शिवसेनेसोबत गेला तरी स्वत:चे  अस्तित्व टिकवून आहे.  निवडणुका स्वत:च्या चिन्हावरच लढलो. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आठवलेसाहेबमंत्री झाल्यानेच काहींच्या डोळ्यात खुपत आहे. आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत म्हणूनच जिल्ह्यात आठवले  गटाची ताकद आहे. - प्रकाश लोंढे, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पक्ष आठवले गट

रामदास आठवले म्हणत असले तरी प्रकाश आंबेडकर हे काय नेतृत्व स्वीकारणार नाहीत. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भीमा - कोरेगावच्या घटनेनंतर आठवले यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला  असून, त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. समाज त्यांच्या विरोधात गेला, याची जाणीव त्यांना झाली म्हणूनच ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. - अशोक दिवे, कार्याध्यक्ष भीमशक्ति सामााजिक संघटना

रामदास आठवले हे भाजपाचे प्रवक्ते झाले आहेत. ते आंबेडकरवादी राहिलेच नाही. त्यांनी रिपाइंचा नेता म्हणून फिरणे बंद करावे. समाजाबद्दल दु:ख करणे सोडून द्यावे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत  सर्वसमावेशक बहुजन वर्ग एकत्र येत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीला सोबत घेतले नाही तर सर्वजातींसाठी काम केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन  प्रकाश आंबेडकर वाटचाल करीत आहेत. दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून पोळी भाजण्याचे दिवस आता गेल्याचे काँग्रेस आणि भाजपालाही कळाले आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर  पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने ते सिध्दही झाले आहे. या घटनेनंतर तर जनतेला आठवले, मायावती, रामविलास पासवान यांच्यापैकी कोणाचेच नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे प्रकाश  आंबेडकर यांचे नेतृत्व पुढे येत आहे. - डॉ. संजय जाधव, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ