Fri, Feb 22, 2019 07:28होमपेज › Nashik › जिल्ह्यातील खरीप पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या

जिल्ह्यातील खरीप पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या

Published On: Jun 20 2018 1:14AM | Last Updated: Jun 19 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

जून महिना संपायला 10 दिवस शिल्लक असतानाही जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा करणार्‍या बळीराजाच्या चेहर्‍यावर चिंतेचे ढग दाटून आले आहे.

खरीप हंगामातील  सहा लाख 76 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरण्या होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार रासायनिक खते, बियाणे परवानाधारक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांनीही शेतीची मशागत करून बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहेत. पण,20 दिवसात जिल्ह्यात जुजबी स्वरूपाचा पाऊस झाल्याने पेरण्यांना अद्याप सुरूवात झाली नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

गेल्या शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी पाऊस पडला. त्यानंतर मंगळवारीही पावसाचे नांदगाव, सिन्नर यासारख्या भागात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. पण, तरीही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. गेल्यावर्षी जूनच्या सुरूवातीला पाऊस पडल्यानंतर थेट जुलैमध्येच हजेरी लावली होती. त्यावेळी सुरूवातीला पडलेला पाऊस पेरणीयोग्य असल्याने शेतकरी फारसे चिंतेत नव्हते. यावर्षी मात्र सुरूवातीपासून पाऊस लांबला असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. 25 जूननंतर  दमदार पावसाचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असल्याने त्यानंतरच खर्‍या अर्थाने पेरण्यांना सुरूवात होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.