Mon, Mar 25, 2019 09:47होमपेज › Nashik › जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा

जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 11:12PMनाशिक: प्रतिनिधी

रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन करीत सोमवारी दिवसभर हजेरी लावलेला वरुणाराजा अखेर पावला. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला संततधारेने दिलासा मिळाला असून, सोमवारी दिवसभरात 142.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्री उशिराही संततधार सुरूच होती.दरम्यान, संततधारेने शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत  झाले होते. 

मान्सून यंदा दोन दिवस आधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी 7 जूनच्या रात्री धो-धो बरसल्यानंतर पाऊस गायब झाला होता. पेरणीयोग्य पाऊसच न झाल्याने खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या पेरण्याही रखडल्या होत्या. गेल्या 21 जून 2017 पर्यंत प्रत्यक्ष पेरणी एक लाख 27,310 हेक्टरवर झालेली असताना यावर्षी मात्र याच दिवसापर्यंत अवघ्या 250 हेक्टरवर पेरणी झाली. दुसरीकडे प्रमुख धरणांमधील साठाही जेमतेम होता. पाऊस गायब झाल्याने बळीराजा चिंतेत होता. अखेर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी तर दिवसभर तळ ठोकला होता. सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यावर दुपारी बारानंतर पावसाला सुरूवात झाली. जोर नसला तरी संततधार होती. अधूनमधून जोर काहीसा कमी होत होता. सायंकाळी सहानंतर तर पुन्हा जोर धरला. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात 142.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक 36.5 मिलिमीटर पाऊस पेठ तालुक्यात झाला. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 27, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात 25, नाशिक तालुक्यात 17.1, सुरगाणा तालुक्यात 10  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच, निफाड-3.2, दिंडोरी-9, निफाड-3.2, सिन्नर-3, चांदवड-2, येवला-2, बागलाण-3, कळवण-5 मिलिमीटर याप्रमाणे अन्य तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण हे तालुके मात्र दिवसभर कोरडेच होते. दिवसभर एक थेंबही पडला नाही. सायंकाळी सहानंतर पावसाचा जोर वाढल्याने हवामान खात्याने नोंदविलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात अधिक पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम असाच कायम राहिल्यास रखडलेल्या पेरण्यांना सुरूवात होईल, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

प शहरात सकाळच्या टप्प्यात पावसाने विश्रांती घेतली होती. दुपारी बारानंतर मात्र सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची धावपळ झाली.