Fri, Jul 19, 2019 22:34होमपेज › Nashik › बिपीन गांधींनी रेल्वे स्थानकावरच घेतला शेवटचा श्वास

बिपीन गांधींनी रेल्वे स्थानकावरच घेतला शेवटचा श्वास

Published On: May 09 2018 10:10AM | Last Updated: May 09 2018 11:36AMनाशिकरोड : वार्ताहर 

रेल्वे परिषदेचे अध्यक्ष आणि पंचवटी एक्सप्रेसला आदर्श कोचचा दर्जा निर्माण करून देणारे  बिपीन मनुभाई गांधी (६८ ) यांचे बुधवारी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्याकरिता ते रेल्वे स्थानकावर आले होते. बायपास करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता. मात्र त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंचवटीचे सर्व एकवीस डब्याचे नव्याने नूतनीकरण करण्यात यावे याकरिता बिपीन गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. बुधवारी सकाळी नव्या लूक मध्ये असणारी पंचवटीचा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. रेल्वे परिषेदेचे अद्यक्ष बिपीन गांधी आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटीला हिरवा झेंडा दाखवीला जाणार होता. या लोकार्पण सोहळ्याला सकाळी साडेसहा वाजता मान्यवर उपस्थित होते.  बिपीन गांधी देखील वेळेत हजर झाले. पंचवटी रेल्वे स्थानकावर येण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना प्लॅटफॉर्मवरच गांधी अचानक खाली कोसळले. उपस्थित मान्यवरांनी गांधी यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र गांधी यांच्याकडून फार काही प्रतिसाद मिळाला नाही. येथील जयराम रुग्णालयात गांधी यांना तातडीने हलविले. डॉक्टरांनी गांधी यांना मृत घोषित केले. 

गांधी अन पंचवटी एक्सप्रेस 

बिपीन गांधी आणि पंचवटी एक्सप्रेस यांचे अतिशय अतूट नाते असल्याचे सर्वश्रुत होते. पंचवटी वेळेत धावण्याकरिता आणि तिची निगा तसेच स्वच्छता ठेवण्याकरिता गांधी सदैव प्रयन्तशील असत. बुधवारी पंचवटी चा लोकार्पण सोहळा होता. तत्पूर्वी गांधी यांनीच मुबई , दिल्ली येथे पाठपुरावा करून पंचवटी ला नवीन लूक मिळवून दिला. 

अंतिम ईच्छा अपूर्ण 

नवीन रंगात धावणाऱ्या पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्याची गांधी यांची इच्छा होती. मात्र नियतीने  त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली नाही. पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्याच्या काही मिनिटे अगोदरच काळाने त्यांच्यावर झडप घातली.पंचवटीच्या जडण घडणीचा सिंहाचा वाटा उचलणाऱ्या तसेच रेल्वे प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आयुष्यातील तब्बल तीस वर्षे खर्च करणाऱ्या गांधी यांनी अखेरचा श्वास देखील रेल्वे स्थानकावर आणि पंचवटीच्या प्रतीक्षेत सोडला. बिपिन गांधी हे देवळाली कॅम्प येथे वास्तव्यास होते. त्यांचे घर देखील रेल्वे ट्रॅक  शेजारी होते. मुबंई च्या दिशेने धावणाऱ्या पंचवटी मधील आपल्या लाडक्या प्रवाश्याना गांधी रुमाल दाखवून इशारा देत असत.

राज्यराणीसाठी उपोषण 

नाशिक जिल्ह्यामधून मुबंई येथे रोज अपडाऊन करणाऱ्या चाकर मान्यांकरिता पंचवटीला जोड गाडी म्हणून राज्यराणी होती. ती सुरू करण्याकरिता आणि निर्धारीत वेळेत धावण्याकरिता बिपीन गांधी यांचे प्रयत्न सर्वश्रृत होते. राज्यराणीसाठी गांधी उपोषणाला देखील बसले होते. त्यांच्या अथक प्रयत्नाचा परिपाक म्हणून आज राज्यराणी सुरु आहे.

बापू आता दिसणार नाही 

बिपीन गांधी यांना त्यांचे सर्व सहकारी बापू या टोपण नावाने आवाज देत होते. रेल्वे प्रवाश्याची कोणतीही समस्या असोत बापू वेळ न दवडता मदतीला धावून येत होते.  बापू यांच्या अचानक जाण्याने आता  बापू आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. अशी रुखरुख त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपने दिसत होती.

बिपीन गांधी आणि रेल्वे यांचे अतूट नाते होते. रेल्वे प्रवाश्याच्या समस्या सोडवण्यासाठी कायम झटत राहिले. बिपीन गांधी म्हणजेच रेल्वे आणि रेल्वे म्हणजेच बिपीन गांधी असे जणूकाही अलिखित समिकरणच बनले होते.
-गुरमित रावल , माजी अध्यक्ष एवतारी क्लब 

बापू यांना हृदय विकाराचा त्रास होता, आम्ही त्यांना आता आराम करा, काळजी घ्यावी , असा सल्ला देत होतो. पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदायवाने त्यांना रेल्वे स्थानकांवर मरण आले.  रेल्वे करीता त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.
-देविदास पंडित , जनरल सेक्रेटरी , रेल परिषद 

मुबई येथील समाजकल्याण विभागात मी नोकरी करीत आहे. काही दिवसांपूर्वी अपडाऊनच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण बापूंनी मला नोकरी सोडण्यापासून परावृत्त केले, समजूत काढली. अन्यथा मी आज नोकरी काईत नसतो. 
-विजय कोर , रेल्वे प्रवासी 

हृदय विकाराने बापू खाली कोसळले, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे आवश्यक होते. मात्र दुर्दैव असे की रेल्वे प्रशासनाकडे रुग्णवाहिकादेखील नाही. भुसावळ आणि मुबंई दरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती स्थानक आहे. येथे रुग्णवाहिका नसल्याने बापूंचे निधन झाले.
-राजेश फेकणे , सदस्य , रेल्वे सल्लागार समिती 

 

Tags : rail committee president, Bipin Gandhi, death, heart attack