Tue, May 21, 2019 18:08होमपेज › Nashik › विधान परिषद : सहाणे यांच्या उमेदवारीने भुजबळांनाच धक्‍का

विधान परिषद : सहाणे यांच्या उमेदवारीने भुजबळांनाच धक्‍का

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या गेल्यावेळच्या निवडणुकीत  आमदार जयवंत जाधव यांचा झालेला नाट्यमय विजय आणि अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी आतापर्यंत लढलेल्या न्यायालयीन लढाईचा निकाल हाती येणे अद्याप बाकी असताना यावेळी मात्र, याच सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊन माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे.

राजकारणात फार काळ कोणी कोणाचा शत्रू वा मित्र राहत नाही, याचीच प्रचिती राष्ट्रवादीच्या खेळीने उजेडात आली आहे. स्वर्गीय वसंत पवार यांच्या निधनानंतर जाधव यांना उमेदवारी देऊन भुजबळ यांनी मराठाद्वेषी असल्याचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. गेल्या वेळच्या निवडणुकीत जाधव विरोधात सहाणे अशीच सरळ लढत झाली. शिवसेनेने सहाणे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळेच निवडणूक चुरशीची झाली आणि उमेदवार निवडीचा फैसला थेट चिठ्ठीने केला. अर्थात  जाधव यांचा त्यावेळी झालेला विजय चर्चेचा विषय ठरला होता. तर सहाणे यांनी या निर्णयाविरोधात थेट न्यायालयात दाद मागितली होती. अजूनही न्यायालयीन लढाई सुरूच आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हकालपट्टी केलेल्या याच सहाणे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने विरोधकांसह स्वकियांनाही धक्का दिला आहे. म्हणजे, ज्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढली, त्यांच्याच कळपात म्हणजे राष्ट्रवादीत सामील होण्याची वेळ सहाणे यांच्यावर आली.

ज्यांनी राष्ट्रवादी आणि भुजबळांविरोधात गेल्यावेळी आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या, त्याच सहाणे यांचा प्रचार करण्याची वेळ जाधव यांच्यावर आली आहे. खरे तर, सहाणे यांना उमेदवारी देताना स्थानिक पातळीवरील कोणत्याही पदाधिकार्‍याला विश्‍वासात घेण्यात आले नसल्याचा आक्षेप उमेदवारी अर्ज भरताना नोंदविण्यात आला. भुजबळ यांनी पंधरा वर्षांहून अधिक काळ जिल्ह्याचे पालकत्व निभावले.  ते तुरुंगात असतानाही संघटनेतील प्रत्येक निर्णय त्यांना विचारून घेण्यात आला. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत आमदार अपूर्व आणि अद्वय हिरे यांनीसुद्धा भुजबळ यांची कारागृहात जाऊन भेट घेतली होती. कट्टर विरोधक मानले जाणारे माजी आमदार दिलीप बनकर हेही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्यावेळी भुजबळ यांना भेटून आले होते. पण, सहाणे यांना भुजबळ यांची भेट घेण्याचे सांगण्यात आले तेव्हा त्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे सांगण्यात येते. 

गेल्यावेळी जाधव निवडून येण्यामागे भुजबळांचीच ताकद पणाला लागल्याने त्यावेळी साहजिकच सहाणे यांचा रोष भुजबळ यांच्यावरच होता. त्यामुळे आता सहाणे यांना उमेदवारी देताना भुजबळ यांना विचारात घेण्यात आल्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे, पक्षश्रेष्ठींनी भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनाच दूर ठेवून निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे सहाणे यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Tags : Nashik, push, Chhagan Bhujbal, NCP