Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Nashik › हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा 

हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा 

Published On: Aug 14 2018 6:08PM | Last Updated: Aug 14 2018 6:05PMधुळे : प्रतिनिधी

नंदुरबारच्या खासदार हिनाताई गावीत यांच्यावर हल्ला करणारे हे जातीयवादी विचारसरणीचे असुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायदयाअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. तसेच दिल्लीमधे संविधान जाळणा-यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दलित आदीवासी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

आज (मंगळवार दि. १४) दुपारी धुळयातील फाशीपुल चौकातुन दलित आदीवासी संघर्ष समितीचे प्रमुख अशोक धुळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यात अॅड. विशाल साळवे, शशी वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

हा मोर्चा पोलिस मुख्यालय मार्गे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसिल कार्यालयाजवळुन चाळीसगाव चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासुन आग्रारोड मार्गे जिजामाता विदयालयापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी धुळकर यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आपली भूमिका मांडली.

काही समाज कंटकांनी मराठा मोर्चामध्ये सामिल होऊन  धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दलित आणि आदीवासी समाजाला त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. राजकीय हितासाठी भाजपाचे सरकार राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करीत नाही. महिला सक्षमीकरणाच्या नावाचे धडे देणा-या या सरकारच्या काळात आदीवासी आणि दलीत तसेच मुस्लीम महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. 

खान्देशचे प्रतिनिधीत्व करणा-या आदीवासी महिला खासदार हिनाताई गावीत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई न करता हल्ला करणा-यांना सोडुन दिले. त्यामुळे संबंधीत पोलिस अधिका-यांवर देखिल गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळण्यात आली. हा प्रकार संतापजनक असुन सरकारने यात तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांना तसे केले गेले नाही. याबाबत देखिल नाराजी व्यक्त करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

राज्यातील ७५ हजार जागांची भरती तातडीने करावी, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरावी, आदीवासी पेसा कायदयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सामाजिक मागासलेल्या आधारावर आरक्षण देण्यात यावे, वन हक्क कायदा २००८ नुसार प्रलंबित जुने व नवे हजारो दावे तत्काळ निकाली काढले जावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या. 

दरम्यान, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन सुरू असल्याने पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह अन्य पोलिस पथकाने या रस्त्यावर बॅरीकेट लावुन मार्ग बंद केला होता. मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर थांबविण्यात आला.