होमपेज › Nashik › घरपट्टीवाढीत कपातीचे संकेत

घरपट्टीवाढीत कपातीचे संकेत

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Feb 28 2018 11:57PMनाशिक : प्रतिनिधी

वाढीव घरपट्टीला नाशिककरांचा वाढता विरोध तसेच, आगामी काळातील होणार्‍या निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसू नये, यादृष्टीने भाजपाने घरपट्टी दरवाढीला लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाला ठराव सादर करण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींमध्ये यासंदर्भात खलबते सुरू असून, घरपट्टी 10 ते 12 टक्क्यांपर्यंतच वाढ करण्याचा विचार सुरू आहे. 

गेल्या महासभेत घरपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात निवासी क्षेत्रासाठी 27 ते 33 टक्के, व्यावसायिक क्षेत्रासाठी जवळपास 64 टक्के आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जवळपास 82 ते 102 टक्के इतकी वाढीव घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या वाढीला विरोधी पक्षांसह शहरातील सर्वच उद्योग व्यावसायिक संघटनांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रियाही भाजपा नगरसेवकांमार्फत आमदार आणि पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्याने भाजपा वाढीव घरपट्टीच्या निर्णयावरून बॅकफुटवर येण्यास तयार झाला आहे. 

निवासी क्षेत्रातील घरपट्टी वाढ मागे?

घरपट्टीच्या कारणावरून विरोधकांना राजकीय फायदा मिळू नये आणि आगामी निवडणुकीत त्याचे भाजपाच्या विरोधात जनमत उभे राहू नये, यादृष्टीने भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी वेळीच सावध होत घरपट्टी दरवाढ मागे घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून, निर्णय होत नाही तोपर्यंत ठराव लावून धरण्यात आला आहे. तूर्तास निवासी क्षेत्रातील घरपट्टी वाढ मागे घेण्याचा विचार केला जात आहे.