होमपेज › Nashik › शिक्षण विभागातील २० अधिकार्‍यांची पदावनती

शिक्षण विभागातील २० अधिकार्‍यांची पदावनती

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:25AM

बुकमार्क करा

नाशिक : जिजा दवंडे

शालेय शिक्षण विभागाने विभागीय परीक्षामार्फत भरावयाच्या शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्तपदांवर 2016 मध्ये पदोन्नती दिलेल्या राज्यातील 20 अधिकार्‍यांची पदावनती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षण विभागातील सहसचिव दर्जापासून ते सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना त्यापेक्षा कमी दर्जाच्या पदावर काम करावे लागणार आहे.

यामध्ये नाशिकसह औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नागपूर आदी विभागांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. यात 1 जुलै 2016 रोजीच्या निर्णयान्वये सरळसेवा व विभागीय परीक्षेमार्फत शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्तपदांवर एकूण 37 अधिकार्‍यांना पदोन्नती दिली होती. ही पदोन्नती 11 महिन्यांसाठी देण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

असे असले तरी त्यानंतर या अधिकार्‍यांना कायम ठेवण्यात आले होते, असे असताना सोमवारी (दि.4) शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पदोन्नती देण्यात आलेल्या 37 पैकी 20 अधिकार्‍यांची पदावनती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विविध शिक्षण विभागांत वरिष्ठ स्तरावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांना आता थेट पंचायत समिती स्तरावर गट शिक्षण अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे.

सहायक आदिवासी आयुक्त पी. जे. आंधळे यांना देवळा पंचायत समिती येथे गट शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. धुळे येथील शासकीय विद्यानिकेतनचे प्रचार्य पां. रा. वमने यांना यांना नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे गट शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याच पद्धतीने औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आदी विभागांतील अधिकार्‍यांची पदावनती करण्यात आली आहे.