Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Nashik › मका बियाण्याचे दर वाढले; शेतकर्‍याचे कंबरडे मोडले!

मका बियाण्याचे दर वाढले; शेतकर्‍याचे कंबरडे मोडले!

Published On: Jun 20 2018 1:14AM | Last Updated: Jun 19 2018 11:02PMयेवला : प्रतिनिधी

उत्पादित शेतमालाच्या दरात घसरण दिसून येत असतानाच यंदा खरीप हंगामामध्ये बियाण्यांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मका पिकाच्या बियाण्याच्या एका पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे. येवला तालुक्यामध्ये मका पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी मका बियाण्याच्या वाढत्या किमतीमुळे संकटात सापडला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत मका बियाण्याच्या प्रति पिशवीमागे शंभर ते दोनशे अशी वीस टक्के अधिक दरवाढ झाली आहे.

मागील वर्षी 2016-17 च्या हंगामामध्ये तयार मक्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. यावर्षीच्या 2017-18 च्या हंगामाला मक्याचा भाव हजार ते साडेअकराशेच्या दरम्यानच मिळत आहे. त्या तुलनेत बियाण्याच्या भावात शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ झाली आहे. शासनाने यात लक्ष घालून बियाण्यांच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

बाजरी, मुगाच्या बियाण्याला पसंती 

मागील हंगामामध्ये कपाशी उत्पादकांना बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी कपाशी बियाण्याचे दर कमी करूनही शेतकर्‍यांचा कल कपाशीकडे नसल्याचे दिसते. परिणामी कपाशीच्या लागवडीबरोबरीने बियाण्याच्या विक्रीतही घट राहील, तर खरीप कांद्याने दिलेल्या चांगल्या मोबदल्यामुळे शेतकरी खरीप कांद्याच्या मागे लागला असून, बाजरी व मूग पिकाची यावर्षी जास्त पेरणी होऊन बाजरी व मुगाच्या बियाण्याची मागणी चांगली वाढती राहील, असा अंदाज बियाणे विक्रेते करीत आहेत.