Fri, Apr 26, 2019 01:34होमपेज › Nashik › लासलगाव येथे कांद्याला मिळाला हजार रुपयांचा दर

लासलगाव येथे कांद्याला मिळाला हजार रुपयांचा दर

Published On: Jun 22 2018 2:06AM | Last Updated: Jun 21 2018 11:10PMलासलगाव : वार्ताहर

येथील मुख्य बाजार समिती आवारात कांदा दराने 1 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. अनेक दिवसांपासून पुन्हा कांदा हा 500 ते 800 रुपयांच्या दराने विकला जात होता. मिळणार्‍या दरामध्ये झालेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी वर्गाने कांदा साठवणूक करण्यावर भर दिला होता.

काही महिन्यांपासून उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण सुरू होती. परंतु, गेल्या आठवड्यापासून कांदा दरामधील घसरण थांबली आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना शेतकरीवर्गाला दिलासा मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालूवर्षी राज्यात कांदा उत्पादनात वाढ झाल्याने देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक राहणार आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता जास्त असल्याने ज्या शेतकर्‍यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध आहे अशा शेतकर्‍यांनी त्यांचा कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात या कांद्याच्या आवकेत वाढ होऊन आणखी बाजारभाव कमी होण्याची शक्यता असल्याने हा कांदा वेळीच निर्यात होणे गरजेचे आहे. 

भारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग पडत असल्याने परदेशी आयातदारांकडून भारतीय कांद्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे. भारतातून कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने सुकविलेल्या कांद्याऐवजी सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करणार्‍या निर्यातदारांकरिता निर्यात प्रोत्साहन योजना (एमईआयएस) लागू करावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. बुधवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500, सरासरी 975, जास्तीत जास्त 1191 दर मिळाला.