Wed, Jul 08, 2020 19:10होमपेज › Nashik › वादळी पावसानंतर नंदुरबारचा वीज पुरवठा २० तास खंडित

पावसानंतर नंदुरबारचा वीज पुरवठा २० तास खंडित

Published On: Jun 12 2019 2:21PM | Last Updated: Jun 12 2019 2:21PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे नंदुरबार शहराचा वीज पुरवठा 18 तासांहून अधिक काळ खंडित झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा आणि जनसंपर्क देखील खंडित झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमानाने पुन्हा 42 अंशाची पातळी ओलांडली होती. परिणामी नागरिक उन्हाच्या चटक्यांमुळे आणि उकाड्यामुळे हैराण झाले होते. अचानक मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ढग दाटून आले आणि प्रचंड विजांचा तांडव सुरू झाला. कडाडणाऱ्या विजांनी आणि गडगडणारे ढगांनी वातावरण बदलून गेले. अत्यंत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठले. व्यवसायिकांची तारांबळ उडाली. अनेक विजेचे खांब वाकून गेले. असंख्य वीज तारा तुटून पडल्या. जागोजागी झाडे आणि फांद्या तुटून पडल्या. नंदुरबार तालुक्यातील कोकणी पाडा भोणे शनिमंडळ रनाळे नेहली या भागात घरांचे आणि शेडचे पत्रे उडून गेले तसेच झाडे कोसळून प्रचंड नुकसान झाले.

सुमारे तासभर चाललेल्या वादळी पावसाने नंदुरबारला अक्षरशः झोडपून काढले. अशीच स्थिती नवापूर, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यांमध्येही निर्माण झाली.  महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.  अद्याप प्राणहानी झाल्याचे किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 

मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्‍यापासून वीज खंडित झालेली आहे. संपूर्ण रात्र शहराला अंधारातच काढावी लागली. दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे संपूर्ण नंदुरबार शहरात आज बुधवारी  दुपारच्या दोन वाजेपर्यंत वीज खंडितच राहिली. 20 तासांपासून वीज नसल्यामुळे इन्व्हर्टर आणि जनरेटर सारखी साधने सुद्धा निकामी झाली. परिणामी मोबाईल टॉवरचा संपर्क खंडित होणे, चार्जिंग नसल्यामुळे लोकांचे मोबाईल बंद होणे, विजेवर चालणारी सर्व उपकरणे आणि व्यवसाय ठप्प होणे अशा विचित्र संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान  सर्वत्र  पुन्हा कडकडीत ऊन पडले असल्यामुळे प्रचंड उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तुटलेल्या वीजतारा जोडून वीज पुरवठा पूर्ववत करायला आज बुधवारची सायंकाळ उलटू शकते, असा अंदाज वीज वितरणच्या कर्मचार्‍यांकडून वर्तविला जात आहे. आज बुधवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज लक्षात घेता तोपर्यंत सर्व दैनंदिन कामे विस्कळीत राहणार असे दिसत आहे.