Sat, Feb 23, 2019 18:18होमपेज › Nashik › साध्या वेशातील पोलिसांची ‘व्हॅलेंटाइन डे’वर नजर

साध्या वेशातील पोलिसांची ‘व्हॅलेंटाइन डे’वर नजर

Published On: Feb 14 2018 1:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:05PMनाशिक : प्रतिनिधी

‘व्हॅलेंटाइन डे’मुळे तरुणाईमध्ये उत्साह असून, या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे. त्यानुसार महाविद्यालयीन परिसरांसह तरुणाईचा वावर असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निर्भया पथक, पर्यटन व्हॅन तसेच पोलीस ठाणेनिहाय स्वतंत्र पथक शहरात ठिकठिकाणी गस्त घालणार आहेत.

बुधवारी (दि.14) सर्वत्र व्हॅलेंटाइन डेची धामधूम राहणार आहे. तरुण-तरुणी महाविद्यालयांसह चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे, विविध हॉटेल्स, गंगापूर धरण, सोमेश्‍वरसह विविध ठिकाणी जमतील. त्यामुळे मित्रांव्यतिरिक्‍त अनोळखी तरुण किंवा टवाळखोर प्रवृत्तीचे युवक तरुणींना त्रास देण्याची शक्यता असते. तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आणि टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार काही ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणीदेखील केली जाणार आहे. जेणेकरून सुसाट वाहने चालवणार्‍यांवर अंकुश ठेवता येणे शक्य होणार आहे. तरुणाईचा वावर असलेल्या ठिकाणी साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांना रंगेहाथ पकडण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.