Fri, Aug 23, 2019 15:21होमपेज › Nashik › शाळांच्या क्रीडांगणाचा निधी हडपला!

शाळांच्या क्रीडांगणाचा निधी हडपला!

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 10:55PM

बुकमार्क करा
कळवण : वार्ताहर

कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत 24 शासकीय आश्रमशाळांना क्रीडांगणासाठी लाखो रुपयांचा निधी येऊन संबंधित विभागाने खर्चही केला. परंतु, जुनेच क्रीडांगण किरकोळ दुरुस्ती करून निधी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल विभागाला खडी, मुरुमची रॉयल्टी न भरता कामे करण्यात आल्याने या कथित भ्रष्टाचाराची सीबीआय विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत लाखो रुपयांचा निधी क्रीडांगण तयार करण्यासाठी शासकीय आश्रमशाळांना देण्यात आला आहे. त्या निधीतून क्रीडांगणाचे काम करण्यात आले. मात्र खडी, मुरमाची आवश्यक रॉयल्टी महसूल विभागाला भरण्यात आली नसल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. महसूल भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यामुळे संबंधित मुख्याध्याकावर शासनाने कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

कळवण प्रकल्प अंतर्गत क्रीडांगणासाठी 99 लाख 35 हजार रुपयांचा निधी आला होता. मात्र, जुने क्रीडांगण दाखवून निधी हडप करण्याचा प्रकार मुख्याध्यापक, ठेकेदारांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आलेला नाही. क्रीडांगणाचे मोजमापही करण्यात आलेले नाही. असे असताना मुख्याध्यापकांनी ठेकेदाराला निधी कोणत्या नियमात दिला, असा प्रश्‍न विचारला जात आहे. निविदेनुसार कामे करण्यात आली नसल्यामुळे लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.