Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Nashik › ब्लॉग : पटोलेंचा नाराजीनामा विदर्भाच्या राजकारणावर परिणाम करणार!

ब्लॉग : पटोलेंचा नाराजीनामा विदर्भाच्या राजकारणावर परिणाम करणार!

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:21AM

बुकमार्क करा

अविनाश पाठक

भारतीय जनता पक्षातील आयातीत वैदर्भीय नेते खा. नाना पटोले यांनी अखेर  आपल्या खासदारकीचा आणि भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा अपेक्षित असला तरी इतक्या तातडीने दिला जाईल, असे वाटत नव्हते. मात्र, राष्ट्रीय स्तरावरील आणि गुजरातमधील काही घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे माध्यमांसमोर स्पष्टही केले आहे.  पटोलेंनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना तोंड फुटले आहे. त्यातील प्रमुख मुद्दे म्हणजे आता पटोले कोणत्या पक्षात जाणार आणि त्यांच्या या खेळीचा विदर्भाच्या राजकारणावर काय परिणाम होणार, अशा दोन मुद्यांवर सर्वच राजकीय पत्रपंडित आपले तर्कवितर्क लढवित आहेत. 

भं डारा जिल्ह्यातील साकोली परिसरात लहानचे मोठे झालेले नाना पटोले 1987 मध्ये जिल्हापरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय क्षितिजावर सक्रिय झाले. जिल्हापरिषद सदस्य म्हणून आपले बस्तान बसविल्यावर 1999 मध्ये ते काँगे्रस सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेत आले. विधानसभेत असताना वैदर्भीय शेतकर्‍यांच्या विशेषत: भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या धान उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांवर वेळोवेळी आवाज उठवणारे जागरुक सदस्य म्हणून आपली ओळख त्यांनी निर्माण केली. त्यामुळे की काय 2004 मध्ये ते पुन्हा निवडून आले.  2008 मध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर तत्कालिन आघाडी सरकार उदासीन आहे असा आरोप करीत विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या आमदारकीचा त्यांनी राजीनामा दिला होता.

त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्रातून त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी तगडी लढत दिली. अपक्ष म्हणून दोन लाखावर मते घेण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यानंतर मुंडे आणि गडकरी यांनी पुढाकार घेत त्यांना भाजपवासी केले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून ते विधानसभेत गेले. हा 5 वर्षाचा कालखंडही अत्यंत आक्रमकपणे त्यांनी गाजविला. 2014 मध्ये त्यांना भाजपने भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. यावेळी असलेल्या मोदी लाटेमुळे त्यांनी प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करीत लोकसभा गाठली. नव्या भाजप सरकारमध्ये आपल्याला अजून एखादे सन्मानाचे पद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.

मात्र राज्य किंवा केंद्र असे कुठेच पद न मिळाल्याने ते नाराज होते. गत 6 महिन्यांपासून त्यांनी पक्षाच्या बैठका किंवा कार्यक्रमांना जाणे बंद करीत खुलेआम पक्षनेतृत्त्वावर टीका करणे सुरू केले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर कारवाई होण्यात होईल किंवा तेच पक्षाचा राजीनामा देतील अशी चिन्हे दिसत होती.  राजीनामा देऊन ही भाकिते त्यांनी खरी केली आहेत. आता ते कोणत्या पक्षात जाणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. भाजपमध्ये संघर्ष सुरू होताच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना स्वगृही येण्याचे निमंत्रण देऊन टाकले होते. मात्र आज तरी ते काँगे्रसमध्ये जाण्याच्या मानसिकतेत असावे असे दिसत नाही. कदाचित राणेंचे अनुभव त्यांच्यासमोर असल्याने ते असा विचार करीत असतील.

असेही बोलले जात आहे. प्रसंगी आपण वेगळा पक्ष काढू शकतो असे संकेतही त्यांनी दिले आहेत. ते विदर्भवादी असल्याने वेगळ्या विदर्भाचे समर्थकही त्यांना या चळवळीत उतरण्याबाबत आग्रह धरू शकतात. या संदर्भात ते निर्णय कोणता घेतात यावर पुढली राजकीय गणिते अवलंबून राहू शकतात. पटोलेंनी भाजपा सोडल्याने विदर्भात भाजपवर काही परिणाम होईल काय या प्रश्‍नाचे उत्तर आज तरी नकारार्थीच मिळते. विदर्भात भाजपाचे दोनच नेते सर्वमान्य आहेत. ते म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस बाकी मग मुनगंटीवार, अहीर, तडस, पांडुरंग फुंडकर, चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा, अरुण अडसर असे सर्वच नेते त्यांच्या त्यांच्या स्थानिकस्तरावर आपले स्थान ठेवून आहेत.

पटोलेही त्याच दर्जाचे नेते आहेत. ते ओबीसीतील कुणबी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. कुणबी समाज विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असे असले तरी कुणबी समाजाने त्यांना सर्वमान्य नेता म्हणून स्वीकारले असे चित्र आज तरी दिसत नाही. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातही त्यांचे साकोली विधानसभा क्षेत्र वगळता उर्वरित भागात त्यांचा फारसा जोर असल्याचे जाणवत नाही. या दोनही जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये भाजपचे इतर नेते आपआपले वजन ठेऊन आहेत. याच दोन जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाइतकीच लोकसंख्या असणार्‍या पोवार समाजाचे माजी खा. शिशूपाल पटले, दुसरे माजी खा. महादेव शिवणकर आणि डॉ. खुशाल बोपचे हे सध्या अडगळीत गेलेले नेते आता पुन्हा सक्रीय होऊ शकतात. हे नेते सक्रीय झाले तर हे पटोलेंसमोर निश्‍चितच आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे विदर्भ तर सोडा पण भंडारा, गोंदिया लोकसभा क्षेत्रातही फारसा परिणाम होईल अशी चिन्ह आज दिसत नाहीत.  

नाना पटोले यांनी आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसचे दिग्गज प्रफुल्ल पटेल यांना आपला प्रतिस्पर्धी म्हणून बघितले आहे. मधल्या काळात गुजराथी समाजाचे असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी गुजराथीच असलेल्या नरेंद्र मोदींशी बर्‍यापैकी जुळवून घेतलेले दिसत आहे. त्यामुळेच पटोले अस्वस्थ झाले आणि पुढील सगळा घटनाक्रम घडला असे बोलले जाते. ही माहिती जर खरी मानली तर भविष्यात खूप काही वेगळेही घडू शकते. अर्थात या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत त्या होतील तेव्हाच त्या खर्‍या किंवा खोट्या ठरवल्या जातील. मात्र आजच्या स्थितीत पटोलेंच्या राजीनाम्याने विदर्भाच्या राजकीय वर्तुळा फारसे काही परिणाम होतील असे चिन्ह दिसत नाही.