Tue, Nov 20, 2018 11:06होमपेज › Nashik › पोलीस-पदाधिकारी वादात वाहतूक ठप्प

पोलीस-पदाधिकारी वादात वाहतूक ठप्प

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:54PM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर 

वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असतानाच आता राजकारण्यांनाही याचा फटका सहन करावा लागल्याची घटना मंगळवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौफुलीवर घडली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांनी पोलिसांना सूचना केल्याने नाराज झालेल्या कर्मचार्‍याने, सीटबेल्ट लावला नसल्याचे कारण देत थेट दंडाची पावती त्यांच्या हातात टेकवली.

मंगळवारी (दि.12) दिलीप खैरे हे कामानिमित्त मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौफुलीवरून चारचाकी वाहनातून जात असताना या ठिकाणी वाहतूक शाखेचे काही कर्मचारी महामार्गातील एका लेनमध्ये उभे राहून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी खैरे यांनी आपल्या वाहनातून या कर्मचार्‍यांना महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांपैकी  एका कर्मचार्‍याने खैरे यांना, तुम्हीच सीटबेल्ट लावला नसल्याचे सांगत त्यांना दंड भरण्यास सांगितले. तसेच गाडी सोडणार नसल्याचे सांगत थेट दंडाची पावती खैरे यांच्या हातात ठेवली. 

त्यामुळे या ठिकाणी काही वेळ वादावादी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर खैरे यांनी स्वामीनारायण पोलीस चौकीत येऊन दंडाची रक्कम भरली.