Thu, Apr 25, 2019 18:42होमपेज › Nashik › ऑक्सिजन पुरविणाऱ्या दोन कंपन्यांचे उत्पादन व विक्री बंद

ऑक्सिजन पुरविणाऱ्या दोन कंपन्यांचे उत्पादन व विक्री बंद

Published On: Jan 10 2018 8:29PM | Last Updated: Jan 10 2018 8:29PM

बुकमार्क करा
सातपूर: वार्ताहर 

शहरातील विविध रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या शहरातील तीन पैकी दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत उत्पादन प्रक्रीया व विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकाच कंपनीवर ऑक्सिजन पुरविण्याची नामुष्की ओढवली आहे. या कारवाईने शहरातील रुग्णांच्या जिवीताशी खेळ होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

गेल्या वर्षी सिन्नर एमआयडीसीतील एका कारखान्यात वेल्डींगचा गॅस रुग्णांसाठी वापरले जात असल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच अन्न व औषध प्रशासनाने सातपूर औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर ही कारवाई केल्याने रुग्णांचे आरोग्य राम भरोसे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकुण पाच कंपन्या हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा करतात. पैकी दोन ग्रामीण भागात तर शहरातील तीन कंपन्या विविध रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करतात. सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाशिक ऑक्सीजन व रविंंद्र ऑक्सीजन ह्या तीन पैकी दोन कंपन्या आहेत.

कंपनीत चाचपणी (टेेस्टींग) करीता मान्यताप्राप्त व्यक्ती नसणे तसेच उत्पादनाचा अभिलेखा नसणे या कारणावरुन अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावत उत्पादन व विक्रीवर बंदी आणली आहे. औषधे व सौदर्य प्रसादने कायदा 1940 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक ऑक्सीजन कंपनीने अन्न व औषध प्रशासनाकडे खुलासा सादर केला असून रविंद्र ऑक्सिजन कंपनीने अद्याप खुलासा दिलेला नाही. खुलासा हा समाधानकारक नसल्यास कंपनीचा परवाना निलंबन किंवा रद्द होवु शकतो. अशी माहिती सहआयुक्त ओमप्रकाश साधवानी यांनी दिली आहे. रुग्णांच्या जिवीताशी खेळ शहरातील विविध रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा अत्यावश्यक आहे. माञ हा पुरवठा कुठून व कशाप्रकारे होतो याकडे बघणे आवश्यक आहे. याची सर्वस्वी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. माञ शहरातील तीन पैकी दोन कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईची वेळ येणे ही गंभीर बाब असून एक प्रकारे रुग्णांच्या जिवीताशी खेळच सुरु असल्याचे म्हटल्याल वावगे ठरु नये.