होमपेज › Nashik › घिसाडी कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा आदेश

घिसाडी कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा आदेश

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 11:07PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

कायद्याचे राज्य म्हणजे काय, असा प्रश्‍न पडावा, अशी घटना नाशिक जिल्ह्यातील  येवला तालुक्यातील बाभूळगाव येेथे घडली आहे. काळ बदलला... स्वतंत्र भारतात लोकशाही पद्धतीने जीवन जगणे सुरू असताना, एका घिसाडी-लोहार या भटक्या समाजाच्या कुटुंबाला गाव सोडून जाण्याचा लेखी आदेशच गावप्रमुखांनी दिला आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सरपंच, ग्रामसेवकासह पोलीसपाटील यांनी संबंधितांना सात दिवसांच्या आत गाव सोडून जाण्याची नोटीस दिल्याने हादरलेल्या कुटुंबाने आता आम्ही कुठे जायचे, असा सवाल करीत आमच्या मागच्या पिढ्या भटकत खपल्या व आता आम्ही अन्  मुलाबाळांनीही तसेच भटकावे का, असा  संतप्‍त सवाल केला आहे.

येवला तालुक्यातील बाभूळगाव येेथे चार-पाच वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या गंगाराम साळुंके यास सरपंच, ग्रामसेवक व पोलीसपाटील यांनी सात दिवसांच्या आत गाव सोडून जाण्याचा आदेश एका नोटिसीद्वारे दिला. साळुंके हे विळे, खुरपे बनवणारे कारागीर आहेत. त्यांची मुले बाभूळगावलाच शाळेत शिकतात. याबाबत ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता, ग्रामसेवकाने मी बाहेरगावी आहे, आल्यावर तुम्हाला भेटतो, असे सांगत केवळ नोटीस दिल्याचे मान्य केले. सरपंचांशी संवाद साधला असता, त्यांनीही बोलणे टाळले. तर गावातील लोकांनी केलेल्या तोंडी तक्रारीवरून असा आदेश दिल्याची कबुली पोलीसपाटलाने दिली आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकणार असल्याचे दिसत असल्यामुळे हे तीनही गावकारभारी आता संबंधित कुटुंबाबाबत तोंडी तक्रारी आल्याचे सांगत जबाबदारी झटकत आहेत. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल आहे.