Tue, Apr 23, 2019 01:54होमपेज › Nashik › घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 11:52PMनाशिक : प्रतिनिधी 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या पहिल्याच महासभेत नाशिककरांना दणका देत भाडेमूल्यदरावर घरपट्टीमध्ये 33 टक्के इतकी भरमसाठ दरवाढ केली. सत्ताधारी भाजपानेही त्यास समर्थन दिल्याने संतप्त विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. घरपट्टी दरवाढीच्या विरोधात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देत विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांनी मागे घेतल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली महासभा वादळी ठरली. घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढ करू नये. यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक काळा शर्ट परिधान करून आले होते. महासभेच्या प्रारंभी आयुक्तांनी पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मागे घेतला. मात्र, घरपट्टी दरवाढदेखील मागे घेतली जाईल, हा विरोधकांचा होरा साफ चुकीचा ठरला. गुरुमित बग्गा यांनी महापालिकेच्या मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय दरवाढ करू नये असे सुचविले. विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी ‘दत्तक’ नाशिकला वर्षपूर्ती होत असून, घरपट्टीत वाढ केली तर हा नाशिककरांसाठी काळा दिवस ठरेल, या शब्दांमध्ये भाजपाला खडेबोल सुनावले. रमेश धोंगडे यांनी मिळकत सर्वेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करुन गोलमालचे आरोप केले. संतोष गायकवाड म्हणाले, घरपट्टीत वाढ केली तर जनता भाजपाला सोडचिठ्ठी देईल. राष्ट्रवादीचे गटनेते शेलार यांनी बहुमताच्या जोरावर हा निर्णय रेटून नेऊ नका, असा इशारा देत दरवाढीला विरोध दर्शवला. काँग्रेस गटनेते शाहू खैरे, दिलीप दातीर, डॉ.हेमलता पाटील यांनीदेखील विरोध केला. तर, सभागृहनेते दिनकर पाटील, पक्षाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे यांनी घरपट्टी दरवाढीचे समर्थन केले. आयुक्तांनी स्मार्ट सिटीसाठी दरवाढ गरजेची असल्याचे सभागृहाला मार्गदर्शन करताना सांगितले. महापौर भानसी यांनी दरवाढीला संमती दिल्याने विरोधक संतापले. सर्व विरोधकांनी एकत्र येत निषेधाच्या घोषणा देत सभागृहातून काढता पाय घेतला.

आयुक्त म्हणतात ‘मला फेल व्हायचे नाही....

विकासासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यासाठी घरपट्टीत दरवाढीचा कटू निर्णय घ्यावा लागेल. नाशिक शहराचा आढावा घेतल्यावर आरोग्य व गोदावरी प्रदूषण या प्रमुख समस्या असून, न्यायालयाने याबाबत फटकारले आहे. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी 250 कोटींची गरज आहे. त्यासाठी शासनावर किती अवलंबून रहायचे. त्यासाठी घरपट्टी दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. मागील 18 वर्षांमध्ये याबाबत निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आयुक्त म्हणून मला माझ्या कामात फेल व्हायचे नाही, या शब्दांमध्ये त्यांनी सभागृह सदस्यांना सुनावले. नगरपेक्षा आपल्याकडे घरपट्टीचे दर कमी आहेत. पिंपरी चिंचवडला 750 कोटी, नवी मुंबईला 482 कोटी उत्पन्न मिळते. मात्र, ‘ब’ गटात असुनही नाशिकला केवळ 82 कोटी उत्पन्न मिळते असे सांगत भाडेमूल्यदरावर घरपट्टी दरवाढीला मान्यता दिली.

शेलार म्हणतात हे तर अफजल खान...

स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी घरपट्टी दरवाढीचे समर्थन करत विरोधकांनी दिलेल्या जनआंदोलनाच्या  इशार्‍याची पाहून घेऊ, या शब्दांमध्ये खिल्ली उडवली. त्यामुळे संतापलेल्या गजानन शेलार यांनी घरपट्टी दरावढीचा ठराव स्थायीवर मंजूर नसताना सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी तो महासभेवर पाठवला कसा असा सवाल उपस्थित केला. शेलार म्हणाले हे कसले शिवाजी हे तर अफजल खान, असे सांगत त्यांनी गांगुर्डे यांना  हिणवले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला होता.