लासलगाव : वार्ताहर
चांगला भाव मिळेल, या उद्देशाने अनेक शेतकर्यांनी कांदा हा चाळीत साठवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. 13 ऑगस्ट रोजी सरासरी 1030 रुपये प्रतिक्विंटलने विकला जाणारा उन्हाळ कांदा हा आज 830 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पंधरा दिवसांत कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
उन्हाळ कांदा हे परिसरातील शेतकर्यांचे हुकमी पीक आहे. त्यात मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने यावर्षीही शेतकरीवर्गाने कांदा हा साठवण करण्यावर भर दिला. चार पैसे मिळतील, या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता बदलत्या वातावरणामुळे चाळीत सडू लागला आहे. त्यातच कांदा बाजार हे 800 ते 900 रुपयांच्या पुढे जात नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
एकरी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांपर्यंत खर्च करून कांद्याला भाव मिळत नसल्याने याची चिंता शेतकर्यांना लागली आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा की नाही, भाव वाढतील का, आता विक्री केला अन् उद्या भाव वाढले तर अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी अडकलेला आहे. उन्हाळ कांद्याला पाच ते सहा महिने टिकवण क्षमता असल्याने शेतकरी वर्ग गरजेनुसार हा कांदा विक्री करत असतो आणि साठवणुकीला प्राधान्य देतो.
काही शेतकर्यांनी काढणीनंतर लागलीच मार्च-मे महिन्यात उन्हाळ कांदा सरासरी 600-700 रुपयांनी विक्री केला होता. त्यावेळी कांद्याची प्रतही उत्तम होती तर वजनही भरघोस होते. मात्र, मागील वर्षाप्रमाणे जुलैनंतर तेजी आली तर भाव दोन हजारांपर्यंत जातील, या अपेक्षेने काही शेतकर्यांनी तेव्हा विक्री न करता कांदा चाळीत साठवला होता. त्याच अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने उन्हाळ कांदा हा चाळीत साठवलेला आहे.
तीन-चार महिने चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकर्याला चार पैसे मिळावे ही रास्त अपेक्षा असते. मात्र, कांदा दरावरील शुक्लकाष्ठ काही कमी होताना दिसत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.