Wed, Sep 26, 2018 08:38होमपेज › Nashik › अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना 

अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना 

Published On: Jun 25 2018 1:50AM | Last Updated: Jun 24 2018 11:57PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 25) निवडणूक होत असून, जिल्ह्यात 25 मतदान केंद्रांवर 14 हजार 873 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्र अधिकारी तसेच, कर्मचारी मतदान पेट्या व साहित्यासह रविवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले. 

मतदान केंद्रांकडे रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांना निवडणूक प्रक्रियेचे अखेरचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदानसंदर्भात तसेच ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याबाबत काही सूचना दिल्या. दरम्यान, सकाळी 11.30 वाजता पहिले वाहन मतदान केंद्राकडे रवाना झाले. 

नाशिक जिल्ह्यात 70 ते 94 अशी मतदान केंद्रे आहेत. नाशिक शहरात पाच केंद्र असणार आहेत. दरम्यान, प्रत्येक केंद्रांवर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्र अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, दोन सहायक अधिकारी, शिपाई तैनात असणार आहे. या कर्मचार्‍यांसोबत एक पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचतील. त्यानंतर या एकत्रित पेट्या अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्राकडे नेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार शरद घोरपडे, नायब तहसिलदार आर. एन. पवार, अमित पवार आदी उपस्थित होते.