Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Nashik › नायलॉन मांजाविक्रेत्यांचा  पोलिसांना चकवा

नायलॉन मांजाविक्रेत्यांचा  पोलिसांना चकवा

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:56PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नायलॉन मांजा विक्रीवरील बंदीचा शासनाकडून सक्त आदेश असतानाही जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना चकवा देत शहरात मांजाविक्री सर्रासपणे सुरू आहे. राजकीय पदाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने नायलॉन मांजाविक्री सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. मकरसंक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात नायलॉन मांजाचा प्रवेश होणार नाही, यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. 

मकरसंक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपल्याने पतंगप्रेमींची लगबग सुरू झाली आहे.  मोकळ्या मैदानांवर बच्चे कंपनी पतंग उडवू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असे आहे. शुक्रवारी (दि.15) सायंकाळी जुने नाशिकमधील दूधबाजारात एका मांजा विक्रेत्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14 हजारांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. बंदी असलेला नायलॉन मांजा पक्ष्यांच्या, तसेच माणसांच्या जिवावर बेतत असून, त्यावर वेळीच कारवाईची गरज आहे. नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली असतानादेखील शहरात या मांजाची खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. संक्रांतीचा सण जवळ आल्याने शहरात मांजा येण्यास सुरुवात झाली आहे. शहरात येण्यापूर्वीच हा मांजा रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे.