Tue, Mar 26, 2019 20:03होमपेज › Nashik › ‘तिला’ लाभले सुरक्षेचे छत्र

‘तिला’ लाभले सुरक्षेचे छत्र

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:42PMजेलरोड : वार्ताहर 

नांदेडहून नाशिकरोड रेल्वेस्थानकात उतरलेल्या मद्यपी मामाने स्वतःच्याच भाचीला नाशिकरोड बसस्थानकात बेवारसपणे सोडून दिले. सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत एकाच ठिकाणी भेदरलेल्या अवस्थेत बसून असलेल्या पाचवर्षीय चिमुकलीची नाशिकरोड येथे वृत्तपत्राचा व्यवसाय करणार्‍या गौतम सोनवणे यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच सुरक्षितपणे नाशिकरोड बसस्थानकांतील पोलिसांच्या स्वाधीन केले. माणुसकीचे दर्शन घडवत अनोळखी चिमुकलीचा दीड दिवस सांभाळ केला.

नाशिकरोड बसस्थानक येथे शुक्रवारी (दि.25) सकाळी 11 च्या सुमारास नांदेडहून आलेली पाचवर्षीय बालिका तनुश्री अशोक दीक्षित ही नाशिकरोड बसस्थानकाच्या बाजूला एका कोपर्‍यात बसलेली असल्याचे येथील रिक्षाचालक संतोष शिंदे व शिवा साळवे यांच्या लक्षात आले. बालिकेची माहिती रिक्षाचालकांनी या ठिकाणी वृत्तपत्राचा व्यवसाय करणारे गौतम सोनवणे यांना दिली. गौतम सोनवणे यांनी या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता हिंदी भाषेत ‘मामा लेने आने वाले हैे’ एवढेच सांगत होती. परिस्थितीचे गांभीर्य  बघून गौतम सोनवणे यांनी बालिकेशी हिंदी भाषेत संवाद साधला व ती कोठून आली आहे, नाव काय आहे याची विचारपूस केली. चिमुरडीचा विश्‍वास संपादन करीत तिला विचारलेल्या प्रश्‍नाची उत्तरे मिळाली. 

त्यानंतर गौतम सोनवणे यांनी नाशिकरोड बसस्थानकातील पोलीस हवालदार ए. के. गायकवाड यांना सांगितल्यावर त्यांनी मुलीस पोलीस चौकीत आणले. त्यानंतर सायंकाळी 4 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत मुलीला बसस्थानक परिसरात सोडून दिलेला मामा मुलीस शोधत असतानाचे रिक्षाचालकांच्या लक्षात आले. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत त्यास पोलीस चौकीत आणले. त्यामुळे पोलिसांनी मुलीस मामाच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. त्याच्या बॅगेची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये सापडलेल्या पत्रिकेवरील मोबाइल संपर्काद्वारे मुलीच्या पालकांशी नांदेडला संपर्क साधण्यात आला.  गौतम सोनवणे व त्यांच्या पत्नी वैशाली सोनवणे यांनी या चिमुरडीचा सांभाळ केला. यावरून समाजात आजही माणुसकीचे दर्शन होत असल्याचे दिसून येते. त्यानंतर पोलिसांच्या परवानगीने शनिवारी (दि.26) नांदेडहून आलेल्या आईकडे चिमुरड्या तनुश्रीला सोपविण्यात आले. यावेळी चिमुरडीच्या चेहर्‍यावर आईला पाहता क्षणी हास्य दिसून आले.  नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, मंगेश मत्सागर, पी. एम. देशमुख, हवालदार ए. के. गायकवाड, हवालदार एस. आर. माळोदे, पोलीस नाईक पंढरीनाथ बोडके, वृत्तपत्रविक्रेता गौतम सोनवणे, प्रथम सोनवणे यांनी या मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न केले.