होमपेज › Nashik › ... अन मृत बिबट्याने डरकाळी फोडली 

... अन मृत बिबट्याने डरकाळी फोडली 

Published On: Aug 02 2018 10:22PM | Last Updated: Aug 02 2018 10:22PMनाशिकरोड : वार्ताहर

दुचाकीच्या धडकेत बेशुध्द झालेल्या बिबट्याला मृत समजून त्याच्यावर बारदान टाकून त्याच्या आवती-भोवती नागरिक गोळा होऊन चर्चा करीत होते. याचवेळी बिबट्याने उठून अचानक डरकाळी फोडत शेजारच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. यामुळे बिबट्याच्या आजूबाजूला गोळा झालेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व नागरिक जिवाच्या भीतीने  सुरक्षित जागा शोधत सैरा वैरा धावू लागले. 

नाशिकरोड परिसरातील वडनेर दुमाला गावात रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. कैलास डावरे हे आपल्या चार वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन वडणेर  गेट कडून गावाच्या दिशेने येत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या समोर बिबट्याने दर्शन दिले. त्यांनी दुचाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयन्त केला. मात्र, बिबट्या देखील भरदाव  वेगाने रस्ता ओलांडत होता. रस्त्यावर अंधार असल्याने दुचाकीस्वार डावरे यांनी बिबट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, बिबट्या जागेवरच बेशुद्ध पडला. वडनेर येथील केंद्रीय शाळेजवळ हा अपघात झाला. आजूबाजूचे नागरिक येथे गोळा झाले. त्यांनी बिबट्या मृत झाला असे समजून त्याच्यावर बारदान टाकले. असंख्य स्थानिक नागरिक यावेळी बिबट्या जवळ जमा झाले होते. अपघातामध्ये बिबटया मृत झाला अशी बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे मोठया प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झाले. 

नगरसेवक केशव पोरजे यांनी घटनास्थळी धाव घेत उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते  यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान बेशुद्ध झालेल्‍या बिबट्याने अचानक डरकाळी फोडून विष्णू शिंदे यांच्या शेतात धूम ठोकली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.