Mon, Jul 22, 2019 01:09होमपेज › Nashik › ज्‍युनियर कॉलेज शिक्षकांचे जेलभरो आंदोलन 

ज्‍युनियर कॉलेज शिक्षकांचे जेलभरो आंदोलन 

Published On: Feb 02 2018 3:26PM | Last Updated: Feb 02 2018 3:25PMनाशिकरोड : वार्ताहर

नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आंदोलककर्त्या सुमारे दोनशे शिक्षकांना ताब्यात घेत सोडून दिले. 

 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षक संघाने यापूर्वी राज्यभरात तहसीलदार,जिल्हाधिकारी कार्यालय,शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी राज्यभरात संघातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी संघाचे राज्य सरचिटणीस प्रा.संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात निदर्शने केली. तसेच शासनाच्या शैक्षणिक धोरणाविषयी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला असता पोलिसांनी  त्यांना ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात सुमारे दोनशे शिक्षकांना सुमारे २ तास बसवून ठेवले. पुन्हा आंदोलन न करण्याच्या अटीवर त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान शिक्षकांच्या ३२ मागण्या असून यात मूल्यांकनपात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे,२०१२-१३ पासूनच्या शिक्षकांना नियुक्त मान्यता व वेतन देणे,२००५ नंतरच्या सेवेतील शिक्षकांना पेन्शन लागू करणे,कनिष्ठ महाविलयालयाचे प्रशासकीय व्यवस्था स्वतंत्र ठेवणे,अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या तीन फेऱ्या अनुदान विभागाच्या ठेवाव्यात.४२ दिवसांची संपकालीन रजा खात्यावर जमा करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून मानधन दुपटीने करावे. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या ग्रेड पेमध्ये वाढ करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यासारख्या एकूण ३२ मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलनात प्रा.अनिल महाजन,प्रा.के.एन.अहिरे,प्रा.आर.एन.शिंदे, प्रा. डी.जे.दरेकर, प्रा.डी.एम.कदम,प्रा.टी.एस.ढोली,प्रा. ए.टि.पवार,प्रा.बी.पी.दबांगे, प्रा. आर.व्ही.धनवटे,प्रा.व्ही.एम.चव्हाण,प्रा.विलास कोरडे,प्रा.विनायक गांगुर्डे, आदी उपस्थित होते.

यावेळी माजी शिक्षक आमदारांना हुसकले 

येथील माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते हे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी नाशिकरोड पोलीस स्थानकात आले. मात्र प्रा.संजय शिंदे यांसह आंदोलकांनी त्यांना आम्ही आमचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहोत. तुम्ही मध्यस्थी करण्याची आम्हाला गरज नाही असे सुनावत हुसकावून लावले. 

 तर बाराविच्या परीक्षांवर बहिष्कार 

शासनाने आमच्या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास १२ वी.बोर्ड परीक्षेच्या पेपर उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा यावेळी  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस  प्रा.संजय शिंदे यांनी दिला