नाशिक : प्रतिनिधी
ऐन पावसाळ्यात करण्यात येणार्या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाराज झाले असून, यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकार्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांची भेट घेत विरोध दर्शविला. दुसरीकडे प्रशासनाने बदल्यांचे वेळापत्रक तयार करून अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या मंजुरीसाठी फाइल पाठविली आहे.
मेअखेरीपर्यंतच बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याचे सरकारचे आदेश आहेत. पण, यावर्षी नेमकी याचवेळी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने बदल्या करता आल्या नाही. या निवडणुकीचा निकाल लागतो न लागतो तोच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. येत्या गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असला तरी आचारसंहितेचा फेरा मात्र 30 जूनपर्यंत कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेने आचारसंहितेचा मुद्दा सरकारीपातळीवर पोहोचवून बदल्यांसंदर्भात मार्गदर्शन मागविले तेव्हा आचारसंहिता संपुष्टात आल्यावर बदल्या करण्याचे सरकारने कळविले आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळेच बदल्यांची कार्यवाही सुरू केली आहे. वेळापत्रक तयार करून सांगळे यांची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
दुसरीकडे कर्मचार्यांनी मात्र बदल्यांना विरोध दर्शविला आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास तसेच स्थलांतरास अडचण निर्माण होणार आहे. तसेच शाळेत पाल्यांचे प्रवेश घेण्यात आले असून, शाळा सुरू होऊन आता अकरा दिवस झाले आहेत. तेव्हा पाल्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. संघटनांच्या पदाधिकार्यांनी लांडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या सार्याच अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. यावर्षी बदल्या करू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉ. नरेश गिते रजेवर
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते येत्या 3 जुलैपर्यंत रजेवर आहेत. सांगळे यांच्या मान्यतेसाठी फाइल सादर करण्यात आली असली तरी त्या गिते यांच्याशी चर्चा करूनच फायलीवर स्वाक्षरी करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणजे, गिते रजेवरून परतल्यानंतरच बदल्यांचा निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.