नाशिक : प्रतिनिधी
गिरणारे जवळील डंबाळे फाट्यावर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. यानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त टेम्पो पेटवून दिल्याने परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
बाबूलाल रतन बोबडे (रा. वडगाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणारा बाबूलाल मखमलाबाद येथून साहित्य घेऊन एमएच. 15, बीएम 7986 क्रमांकाच्या दुचाकीवरून घराकडे परतत होता. त्यावेळी पाठीमागून येणार्या एमएच. 15, एजी. 1651 क्रमांकाच्या टेम्पोने बाबूलालच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी तेथे गर्दी केली. घटनेची माहिती देऊनही पोलिसांनी तातडीने दखल न घेतल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने अपघातग्रस्त टेम्पोला आग लावली. यामुळे परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
टेम्पोला आग लावल्याप्रकरणी 10 ते 15 जणांविरोधात पोलीस कर्मचारी संजय सांगळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या आगीत टेम्पोचे तीन लाख 47 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.