Sat, Dec 15, 2018 14:24होमपेज › Nashik › बदली रद्द करण्यासाठी डॉ. वाक्चौरे मुंबईत

बदली रद्द करण्यासाठी डॉ. वाक्चौरे मुंबईत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दीपकुमार मीना यांच्या आदेशानेच पदभार सोडू, अशी भूमिका घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक्चौरे यांनी बदली रद्द करण्यासाठी मंत्रालयात तळ ठोकला आहे तर सोमवारी पदभार स्वीकारण्यासाठी आलेले डॉ. विजय डेकाटे यांना मीना यांनी पुन्हा आल्या पावली माघारी पाठवले. दरम्यान, या सार्‍या खेळात म्हणजे आदेशाच्याबाबतीत सरकार मोठे की जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

डॉ. वाक्चौरे यांची धुळे जिल्हा परिषदेत बदली झाल्याचे आदेश गेल्या आठवड्यात प्राप्त झाले असून, त्यांच्या जागी डॉ. विजय डेकाटे यांची बदली झाली आहे. सध्या तरी या दोघा अधिकार्‍यांमध्ये पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. बदलीचे आदेश सरकारने काढले असले तरी डॉ. वाक्चौरे हे मात्र जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशानंतरच पदभार सोडण्यावर ठाम आहे. त्याचमुळे गेल्या आठवड्यात पदभार घेण्यासाठी आलेल्या डॉ. डेकाटे यांना पदभार घेता आला नाही. त्यांना माघारी फिरावे लागले होते. सोमवारी पुन्हा त्यांना याच प्रकाराला सामोरे जावे लागले. मीना यांची त्यांच्या दालनात  भेट घेतली आणि काही वेळानंतर डॉ. डेकाटे जिल्हा परिषदेतून निघून गेले. दुसरीकडे बदलीचे आदेश रद्द करण्यासाठी डॉ. वाक्चौरे यांचा आटापिटा सुरू आहे. रजा घेऊन त्यांनी मंत्रालयात तळ ठोकला आहे. काही आमदारांमार्फत फिल्डिंगही लावण्यात आली आहे.