Thu, Apr 25, 2019 12:04होमपेज › Nashik › नाशिकहून विमानाचेे दिल्लीसाठी उड्डाण 

नाशिकहून विमानाचेे दिल्लीसाठी उड्डाण 

Published On: Jun 15 2018 11:48PM | Last Updated: Jun 15 2018 11:36PMनाशिक : प्रातिनिधी

केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत नाशिक -दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी  प्रारंभ झाला.  दुपारी 2.30 वाजता विमानाने ओझर विमानतळाहून राजधानी दिल्लीसाठी उड्डाण घेतले. यामुळे देश आणि विदेशात कनेक्टिविटीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे 31 जुलै 2018 पर्यंत उडान अंतर्गत नाशिक दिल्लीचे सर्व तिकिटांचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. 

खा. हेमंत गोडसे,  जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उड्डाण झाले.  नाशिकच्या ओझर विमानतळाहून प्रथमच एअर डेक्कनच्या बोइंग विमानाद्वारे सेवा देण्यात येत आहे. जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व रिबन  कापून या सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.  

यावेळी राज शिवकुमार म्हणाले की, पहिल्याच दिवशी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही सेवा अविरतपणे सुरू राहण्यासाठी  उद्योजक, लोकप्रतिनिधी, व्यापार्‍यांसह विविध क्षेत्रांतील मान्वरांचे सहकार्य  मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.   यापुढील काळात सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी जेट एअरवेज कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरसीएस उपक्रमामुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे फायदे देश आणि विविध भौगोलिक शहरांना दिले जाणार आहे. भारतीय प्रवासी, प्रादेशिक व उदयोन्मुख शहरे जोडण्यासाठी व वन स्टॉप निवडीसाठी अनेक पर्याय, सोय व कनेक्टिविटी देणार असून त्यांना प्रगतीच्या दृष्टीने नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. प्रवााशांना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करत असताना सर्वोत्तम इन फ्लाइट उत्पादने व सेवेचा लाभ घेता येणार आहे.  

आरसीएस योजनेतंर्गत जेट एअरवेजने  अलाहाबाद या धार्मिक शहराला लखनौ व पाटणा या राज्यांच्या राजधानींशी जोडण्यासाठी  उत्तर प्रदेशातही सेवा सुरू केली आहे. नवी आरसीएस सेवा आठवड्यातून तीन वेळा दिली जाईल. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी हीींिीं://क्षशीींलरशिी.क्षशींरळीुरूी.लेा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष  संतोष मंडलेचा, ज्ञानेश्‍वर गोपाळे,  मनीष रावल, निमाचे सरचिटणिस श्रीकांत बच्छाव, दलजित सिंग, एचएएलचे महाव्यवस्थापक शेषगिरी राव, एस.पी.खापले, एच.बी.सहारे, आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे  आदी उपस्थित होते.

आंबे लंडनला, तर भाजीपाला दुबईला 

नाशिकहून या विमानसेवेत 3 टन आंबे लंडनला तर 1 टन भाजीपाला हा दुबईला पाठविण्यात आला असल्याची माहिती जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे आता नाशिकचा भाजीपाला व फळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविण्याची व्यवस्था नाशिक-दिल्ली विमानसेवेमुळे झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या शेतकरी आणि व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होणार आहे. 

40 आसने राखीव : 2890 रुपये तिकीट 

जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवेस प्रारंभ झाला आहे. या विमानाची आसन क्षमता 168 आहे. यातील 40 आसने ही उडान योजनेतंर्गत राखीव आहेत. नाशिकहून -दिल्लीप्रवासाठी दर सर्व करांसहीत 2890 रुपये आहेत. तर 40 तिकिटानंतरच्या प्रवाशांना 4658 रुपये तर बिझनेस क्‍लास प्रीमियम क्‍लाससाठी 18,693 रुपये द्यावे लागणार आहे. 12 आसने असणार्‍या या प्रवाशांना अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहे. 

पहिल्याच उड्डाणात 128 प्रवासी दिल्लीसाठी रवाना 

आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवारी  अशी तीन दिवस   नाशिकहून दिल्लीसाठी विमान सेवा राहणार आहे. पहिल्याच दिवशी नाशिकहून दिल्लीसाठी 128 तर दिल्लीहून नाशिकसाठी 140 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे सोमवारसाठी देखील तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जेट एअरवेजच्या अधिकार्‍यांनी सांगितले.   

प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य

एअर कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. दिल्लीसह इतर ठिकाणाहून पर्यटक, उद्योजक, व्यापारी नाशिकमध्ये आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.  त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एअर जेटवेजला आवश्यक ते सहकार्य देणार आहे. नाशिकहून दिल्लीसाठी प्रथम मुंबई आणि नंतर दिल्लीला जावे लागायचे. परंतु, आता नाशिकहून थेट दिल्लीला विमानाने जाता येणार आहे. विमानतळाकडे येणार्‍या रस्त्याची दुरूस्ती लवकरच केली जाणार आहे. 
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी 

नाशिकच्या उद्योजकांची खर्‍या अर्थाने नाशिक- दिल्ली विमानसेवेची मागणी पूर्ण झाली आहे. उद्योजकांसाठी तर विमानसेवा महत्त्वाची आहे. परंतु, शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, लोकप्रतिनिधींचा देखील विमानसेवेला प्रतिसाद मिळेल. विमानसेवेला निमासह सर्व औद्योगिक संघटनांचे पूर्ण सहकार्य राहील. 
-मंगेश पाटणकर, अध्यक्ष, नीमा