Sun, Mar 24, 2019 13:10होमपेज › Nashik › नाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलची खरेदी

नाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलची खरेदी

Published On: Feb 21 2018 5:48PM | Last Updated: Feb 21 2018 5:48PMनाशिक : प्रतिनिधी

शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून त्यात मिळालेल्या दस्तऐवज विकून त्यातून आलेल्या पैशाने नेपाळमध्ये दोन हॉटेल खरेदी करणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे. गणेश भंडारे असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 13 लाख 67 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. तसेच, विविध गुन्ह्यांमध्येही त्यांने सहभागाबाबत कबुली दिली आहे.

भंडारे हा अट्टल चोर असून नाशिकमध्ये टागोरनगर येथे बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोकड त्‍याने चोरू नेली होती. या गुन्ह्यात त्याचा हात असल्‍याचे समोर आल्यावर पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, घरफोडी करून तो नेपाळमध्ये फरार झाला होता. त्यामुळे गुन्हयाच्या तपासात प्रगती होत नव्हती. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक नेपाळला गेले होते. मात्र, भंडारे हा काही हाती आला नाही.

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्यामार्फत भंडारेचे प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरपोलकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, तरी देखील त्यास अटक करण्यात पोलिसांना अपयश आले होते. दरम्यान, भंडारे हा शहरातील सीबीएस येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांकडून मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून बुधवारी (दि.14) त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता भंडारे याने घरफोडीची कबुली देत चोरलेले दागिने मुंबई येथील सराफास विकल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक मुंबईला जाऊन घरफोडीतील 13 लाख 67 हजार 500 रूपये किंमतीचे सोने जप्त केले. भंडारे यांने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणले असून, इतर गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घरफोडी केल्यानंतर भंडारे याने नेपाळला जाऊन त्‍या ठिकाणी चोरीच्या पैशातून दोन हॉटेल खरेदी केले होते. आता त्‍याला रिसॉर्ट खरेदी करायचे होते. त्यासाठी त्‍याला पैशाची आवश्यकता होती. यासाठी भंडारे हा घरफोडी करण्यासाठी नाशिकला आला होता. याबाबत इंटरपोलला माहिती देण्यात आली असून, गुन्हेशाखा पथकाचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ व सहायक पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.