Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Nashik › नाशिककरांना लाभला पाच महिने सहवास

नाशिककरांना लाभला पाच महिने सहवास

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी

आपल्या कटू प्रवचनांसाठी देशभरात विख्यात असलेल्या जैन मुनिश्री तरुणसागर यांचा नाशिककरांना तब्बल पाच महिने बहुमोल सहवास लाभला होता. सन 2004 मध्ये चातुर्मास पर्वासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या तरुणसागरजींच्या प्रवचनांनी नाशिककर भारावले होते. 

मुनिश्री तरुणसागर यांचे शनिवारी (दि. 1) नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या आठवणींना नाशिककरांनी उजाळा दिला. 2004 मध्ये तरुणसागरजींचे वास्तव्य इंदूरमध्ये होते. त्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करण्यासाठी जयचंद पाटणी यांनी पुढाकार घेतला. तरुणसागर यांनी यंदाचा चातुर्मास नाशिकमध्ये व्यतित करावा व त्यांच्या अमोघ वाणीचा लाभ नाशिककरांना लाभावा, अशी विनंती करण्यात आली व ती मुनिश्रींनी स्वीकारली. त्यानुसार ते इंदूरहून नाशिककडे पायी निघाले. 4 जुलै रोजी सकाळी 7 वाजता त्यांचे शहरात आगमन झाले. तत्कालीन महापौर दशरथ पाटील, साध्वी मधुस्मिताजी, अरुणप्रभाजी यांच्यासह शहरातील जैन बांधवांनी त्यांचे स्वागत केले. भद्रकालीतील दिगंबर जैन मंदिर येथून त्यांची स्वागतयात्रा काढण्यात आली. त्यांच्यासमवेत मुनिश्री प्रतीकसागरजीही उपस्थित होते. रविवार कारंजा येथे स्वागतयात्रेचा समारोप झाला, तेव्हा ‘मी ना रामकथा ना भागवतकथा, तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगण्यासाठी नाशिक शहरात आलो आहे’, असे उद‍्गार त्यांनी काढले होते. 

7 जुलै रोजी म्हसरूळ येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ येथे चातुर्मास कलश स्थापनेचा कार्यक्रम झाला. 8 जुलै ते 22 ऑगस्ट या दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत नाशिककरांना त्यांची प्रवचने ऐकण्याची संधी लाभली. दि. 15 ऑगस्ट रोजी शहरात तरुण क्रांती मंच राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले. 18 ते 27 सप्टेंबरदरम्यान पर्यूषण पर्व झाले. 27 नोव्हेंबर रोजी नाशिक महापालिकेतर्फे तरुणसागर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गुरुमाउली अण्णासाहेब मोरे उपस्थित होते. दुसर्‍या दिवशी मुनिश्रींनी नाशिकहून पुण्याकडे प्रस्थान केले होते.