Mon, Nov 19, 2018 06:25होमपेज › Nashik › ‘समृद्धी’मधून बागायती क्षेत्र वगळावे

‘समृद्धी’मधून बागायती क्षेत्र वगळावे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शेतात आमच्या पिढ्यान् पिढ्या खपत असून, वर्षाला 10 ते 12 लाख रुपये एकरी उत्पन्न आम्ही घेतो. शेतात पिकवलेला माल सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचत असून त्यातून मिळणारे समाधान हे समृद्धी प्रकल्पात दिल्या जाणार्‍या नुकसानभरपाईच्या रकमेपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन प्रकल्पातून बागायती क्षेत्र वगळावे, अशी मागणी समृद्धी बाधित शेतकर्‍यांनी केली आहे. 

समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी (दि.27) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेत चर्चा केली. तत्पूर्वी समितीमधील शेतकर्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भाजीपाला भेट दिला. इगतपुरी व सिन्नर तालुक्यात यंदा टोमॅटोचे चांगले पीक आल्याने शेतकर्‍यांना त्याचा चांगला फायदा झाला. दोन्ही तालुक्यातून टोमॅटोसह इतर भाजीपाला देशात व देशाबाहेर निर्यात केला जातो. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. शेतीमधून मिळणार्‍या उत्पन्नावर आमच्या पिढ्यान् पिढ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रकल्पासाठी दिल्या जाणार्‍या नुकसान भरपाईपेक्षा ही रक्कम अधिक मोलाची आहे. कारण, ती आमच्या कष्टाने व घाम गाळून मिळालेली आहे. त्यामुळेच समृद्धीमधून हे दोन्ही तालुक्यातील बागायती क्षेत्र वगळावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी यावेळी केली. 

प्रकल्प करायचाच असल्यास इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या वरच्या भागातील वन जमिनीतून तो नेण्यात यावा, असा पर्यायही यावेळी शेतकर्‍यांनी सुचविला. यावेळी समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, रावसाहेब हारके, शांतराम ढोकणे, रतन लांडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.