Sun, Jul 21, 2019 16:35
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : समाज कल्याण वसतीगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

नाशिक : समाज कल्याण वसतीगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

Published On: Mar 23 2018 6:20PM | Last Updated: Mar 23 2018 6:20PMनाशिक : प्रतिनिधी 

नाशिक पुणे महामार्गावरील नासर्डी नदी पुलाजवळ असलेल्या समाजकल्याण कार्यालय मुलींच्या वसतीगृहात विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी (दि.23) रोजी घडली. गौरी एकनाथ जाधव (वय 21, रा.औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव असून ती नर्सिगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती. या घटनेमुळे वसतीगृह परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी अकस्‍मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात गौरी जाधव ही विद्यार्थीनी राहत होती़  नाशिकमधील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्षात ती शिक्षण घेत होती. गौरीने दुपारच्यावेळी वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़  दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली़. पोलिसांनी शासकीय वसतीगृहातील गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली़.  गौरीने आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़  पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे़ दरम्यान, गौरी जाधवच्या आत्महत्येचे खरे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे़. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़