Wed, Feb 26, 2020 02:54होमपेज › Nashik › नाशिकमध्ये सहा बसेसची तोडफोड

नाशिकमध्ये सहा बसेसची तोडफोड

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:52PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये सोमवारी (दि.1) मध्यरात्रीपासून किरकोळ दगडफेक, वाहनांची तोडफोड झाल्याने शहराच्या शांततेस गालबोट लागले आहे. मंगळवारी (दि.2) सायंकाळपर्यंत शहरात सहा बसेसची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 20 समाजकंटकांना ताब्यात घेतले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात करण्यात आला असून, संशयित समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे.    

सोमवारी भीमा-कोरेगावजवळील गावांमध्ये अज्ञात समाजकंटकांनी वाहनांवर दगडफेक, जाळपोळ केल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. या दंगलीचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहेत. मध्यरात्रीपासून नाशिकरोड, शालिमार, सातपूर, अंबड परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. तरीदेखील काही समाजकंटकांनी मध्यरात्री बसेसवर दगडफेक केली. त्यानंतर दिवसभरात सातपूर, जेलरोड, दसक परिसरात सहा बसेसवर दगडफेक करून नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी 20 समाजकंटकांना ताब्यात घेतले. दरम्यान, दगडफेकीच्या घटना घडल्याने शहर बससेवा पोलीस बंदोबस्तात सुरू ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून अफवा पसरवल्या जात असल्याने सायबर पोलिसांमार्फत सायबर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. गरज भासल्यास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच काही समाजकंटकांच्या पोस्टवरही लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. बंदोबस्ताच्या दृष्टीने आजारपणाच्या रजा वगळून पोलिसांच्या तीन दिवसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपायुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 80 सहायक व उपनिरीक्षकांसह दीड हजार पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाच्या तीन तुकड्याही तैनात असून, गृहरक्षक दलाच्या जवानांची मागणी करण्यात आल्याचे डॉ. सिंगल यांनी सांगितले. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नका

सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेसंदर्भात अफवा पसवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही पोस्टवर विश्‍वास ठेवू नका. त्याची शहानिशा करा, तसेच आक्षेपार्ह माहिती पसरवणार्‍या व्यक्तींची किंवा घोळक्याने फिरणार्‍या समाजकंटकांची माहिती नागरिकांनी 0253-2305233/34 या क्रमांकावर किंवा 9762100100 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवर द्यावी. मागील दंगलीच्या वेळी ज्या समाजकंटकांवर कारवाई केली होती, त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच कोणीही कायदा हातात घेऊन अशांतता पसरवू नका, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त