Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Nashik › सिडकोतील रस्त्यांवरील बांधकामे हटविणारच

सिडकोतील रस्त्यांवरील बांधकामे हटविणारच

Published On: May 25 2018 11:35PM | Last Updated: May 25 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

सिडकोतील अनधिकृत बांधकामे थांबविण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. केवळ रस्त्यांवरील तसेच ड्रेनेज लाइनवरील बांधकामे हटविण्यात येणार आहेत. यामुळे संबंधितांनी रितसर 31 मेपर्यंत महापालिकेत बांधकामे अधिकृत करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

आयुक्त मुंढे यांच्या या वक्तव्यामुळे सिडकोतील बांधकामांविषयी पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत आहे. तोपर्यंत संबंधितांनी मनपा नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत. सिडकोतील सरसकट बांधकामांबाबत आपण कधीही बोललो नव्हतो.केवळ रस्त्यांवरील बांधकामे तसेच ड्रेनेज लाइनवर झालेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाविषयी मी सांगितलेले होते. 

यामुळे ही बांधकामे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याविषयी कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. मुंढे यांच्या या निर्णयामुळे सिडकोमधील नागरिकांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण होणार असल्याने भविष्यात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.